आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Won The First Time In 84 Years, More Than Three Of The Five Test Matches

84 वर्षात भारताने प्रथमच जिंकल्या तीनपेक्षा जास्त सामन्यांच्या पाच कसोटी मालिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- टीम इंडियाने चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लडला डाव व ३६ धावांनी हरवले. पाचव्या दिवशी इंग्लंड १९५ धावांतच गारद झाले. भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत ३-० ने निर्णायक आघाडी घेतली. अश्विनने दुसऱ्या डावात ६ विकेट घेतल्या. २३५ धावांची खेळी करणारा विराट कोहली मॅन ऑफ द मॅच ठरला. भारताने ८ वर्षांनंतर कसोटीत इंग्लडला हरवले.
८४ वर्षांच्या कसोटी इतिहासात भारताने प्रथमच ३ वा त्यापेक्षा जास्त सामन्यांच्या सलग ५ मालिका जिंकल्या. भारताने २००८ ते २०१० मध्ये सलग ५ मालिका जिंकल्या होत्या. पण दोन मालिका दोन सामन्यांच्या होत्या.

टीम इंडियाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मालिकेतील चौथ्या कसोटीत एक डाव आणि ३६ धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या डावात इंग्लिश टीम अवघ्या १९५ धावांत ढेपाळली. या विजयासह कोहली ब्रिगेडने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० ने विजयी आघाडी घेताना मालिका आपल्या नावे केली. इंग्लंडने पहिल्या डावात ४०० धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात ६३१ धावा काढून २३१ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा धुव्वा उडवत विजय निश्चित केला.

याआधी इंग्लंडकडून सलग तीन मालिका पराभवानंतर टीम इंडियाने या वेळी मालिका विजय साजरा केला. यामुळे हा विजय भारतीय संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मालिकेतील शेवटची कसोटी चेन्नईत १६ डिसेंबरपासून खेळवली जाईल. या विजयानंतर कोहलीच्या नावे अनेक विक्रम झालेत. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सलग पाच कसोटी मालिका जिंकणारा कोहली पहिला कर्णधार ठरला आहे.

पाचव्या दिवसाचा खेळ सुरू होताच इंग्लंडचा डाव लवकर संपेल, असे वाटत होते. भारतीय गोलंदाजांनी तसेच केले. इंग्लंडला पाचव्या दिवशी बेयरस्ट्रोच्या (५१) रूपाने पहिला धक्का बसला. त्याला अश्विनने पायचित केले. यानंतर अश्विनने इंग्लिश फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात फसवले आणि बघता बघता संपूर्ण इंग्लिश टीम तंबूत परतली. बेयरस्ट्रोनंतर अश्विनने वोक्सला शून्यावर त्रिफळाचित केले. आदिल रशिद आणि जेम्स अँडरसन यांनाही अश्विननेच बाद केले. दुसऱ्या डावात भारताकडून अश्विनने सर्वाधिक ६ गडी बाद केले. पहिल्या डावातसुद्धा अश्विनने ६ गडी बाद केले होते. रवींद्र जडेजाने ६३ धावांत २ तर भुवनेश्वर कुमार आणि जयंत यादवने प्रत्येकी १ गडी बाद केला. अश्विनने सामन्यात १२ गडी बाद करून इंग्लंडचा सफाया केला.

वानखेडेवर इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना ४०० धावा काढल्या. यानंतर भारताने विराट कोहलीचे द्विशतक, मुरली विजय आणि जयंत यादवच्या शतकाच्या बळावर ६३१ धावांचा डोंगर उभा केला. पहिल्या डावात २३१ धावांनी मागे पडलेली इंग्लिश टीम दुसऱ्या डावात चारीमुंडया चीत झाली. कर्णधार कोहली सामनावीरचा मानकरी ठरला.
अश्विनने कपिलला मागे टाकले
} अश्विनने आपल्या ४३ व्या कसोटीत २४ व्यांदा एका डावात ५ गडी बाद करून कपिल देवचा (२३ वेळा) विक्रम मोडला. आता या यादीत हरभजनसिंग (२५) आणि अनिल कुंबळेनंतर (३५) अश्विन तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. अश्विनने सातव्यांदा कसोटीत १० गडी बाद केले. यात फक्त अनिल कुंबळेच त्याच्या पुढे आहे. अनिल कुंबळेने तब्बल ८ वेळा १० गडी बाद केले आहेत.

} अश्विनने यावर्षी ११ सामन्यांत ७१ बळी घेतले आहेत. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक ७५ गडी बाद करण्याचा भारतीय विक्रमापासून तो केवळ ४ विकेटने मागे अाहे. याशिवाय त्याने २०१६ मध्ये आठव्यांदा ५ गडी बाद केले. यासह त्याने सिडनी बर्न्सच्या विक्रमाची बरोबरी केली. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक ९ वेळा ५ विकेट घेण्याचा विक्रम मुरलीधरन आणि माल्कम मार्शलच्या नावे आहे.

} अश्विनने एका कसोटी मालिकेत चौथ्यांदा २५ किंवा त्यापेक्षा अधिक गडी बाद केले. भारताकडून याआधी फक्त कपिल देवने असे केले आहे. अश्विनने बरोबरी केली.

} वानखेडेत अश्विनने सामन्यात १२ गडी बाद केले. या मैदानावर भारताकडून एका सामन्यात १२ गडी बाद करणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. याअाधी लक्ष्मण शिवरामकृष्णनने १९८४ मध्ये इंग्लंडविरुद्ध १२ गडी बाद केले होते. अश्विनने आपल्या कसोटी करिअरमध्ये पाचव्यांदा १२ गडी बाद केले. हा विक्रम मुरलीधरनच्या (६) नावे आहे.
प्रत्येक विजयासाठी मेहनत केली : कोहली
हा विजय वाटतो तेवढा सोपा नव्हता. कुणी आमच्यासमोर विजयाचे ताट वाढून ठेवले नव्हते. प्रत्येक वेळी प्रतिकूल परिस्थितीत झगडून, मार्ग काढून आम्ही विजयाचे शिखर सर केले आहे, अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचा कर्णधार कोहलीने व्यक्त केली.

आम्ही प्रतिस्पर्ध्यांना दडपणाखाली आणून चुका करायला भाग पाडले. संघातील खेळाडूंना मी यशाचे श्रेय देईन. त्यांनी प्रत्येक वेळी विपरीत परिस्थितीतून बाजी प्रतिस्पर्ध्यांवर उलटवली. संघातील खेळाडूंना जिद्द, झुंजार वृत्ती दाखविल्यामुळे मिळविलेल्या मी यशाचे श्रेय देतो, असेही कोहलीने नमूद केले.

इंग्लंड कसोटीतील दर्जेदार संघ आहे. ते सहजासहजी हार मानणाऱ्यांमधील नाहीत. दोन कसोटी गमावल्यानंतर त्यांनी या कसोटीच्या पहिल्या डावात ४०० धावा केल्या हे त्यांच्या दर्जाचे द्योतक आहे. न्यूझीलंड संघापेक्षा हा संघ हरविण्यासाठी कठीण संघ होता. या वेळी खेळपट्ट्या न्यूझीलंड मालिकेपेक्षा अधिक चांगल्या विकेट होत्या. गोलंदाजांना या वेळी अधिक मेहनत करावी लागली, असेही त्याने म्हटले.
पहिल्या ४०० धावांनंतरही इंग्लंडचा झाला पराभव
इंग्लंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ४०० धावा काढल्या. कसाेटी क्रिकेटच्या इतिहासात फक्त तीन वेळा एखाद्या संघाने पहिल्या डावात ४०० प्लस धावा काढल्यानंतरसुद्धा त्यांचा पराभव झाल्याची घटना घडली. याआधी १९३० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओव्हर येथे इंग्लंड आणि २०११ मध्ये इंग्लंडविरुद्ध श्रीलंका संघाने पहिल्या डावात ४०० धावा काढल्यानंतरसुद्धा पराभव झाला होता.
सलग १७ कसोटीत अपराजित टीम इंडिया
} विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ १७ कसोटीपासून अपराजित आहे. भारताकडून सर्वाधिक १८ कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रम कर्णधार सुनील गावसकर यांच्या नावे आहे. चेन्नई कसोटीत कोहली ब्रिगेड गावसकर यांच्या विक्रमाची बरोबरी करू शकते.
} २०१६ मध्ये भारताने आठवा कसोटी विजय मिळवला. २०१० मध्ये भारताने इतकेच कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम केला होता.
} अॅलेस्टर कुकच्या नेतृत्वात इंग्लंडचा हा तब्बल २१ वा पराभव ठरला. सर्वाधिक पराभवाच्या बाबत त्याने मायकेल ऑथरटनच्या विक्रमाची बरोबरी केली.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, मुंबई कसोटीतील क्षणचित्रे...
बातम्या आणखी आहेत...