कानपूर - आपल्या ५०० व्या कसोटीत चांगल्या सुरुवातीनंतरही मधली फळी कोलमडल्याने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडिया मोठा स्कोअर करू शकली नाही. ग्रीन पार्क स्टेडियमवर पहिल्या दिवशी न्यूझीलंडने भारताच्या २९१ धावांत ९ विकेट घेतल्या. दिवसाचा खेळ संपला तेव्हा रवींद्र जडेजा १६ आणि उमेश यादव ८ धावांवर खेळत होते. किवीज गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करून भारतावर दबाव निर्माण केला. न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि फिरकीपटू मिशेल सँटनर यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. खेळपट्टी कशीही असली तरी चांगल्या गोलंदाजीने विकेट घेता येतात, हे या दोघांनी सिद्ध केले. भारताकडून सलामीवीर मुरली विजयने सर्वाधिक ६५ धावा काढत अर्धशतक ठोकले. याशिवाय चेतेश्वर पुजाराने ६२ धावांचे योगदान दिले. पुजाराने आपल्या खेळीत १०९ चेंडूंचा सामना करताना ८ चौकार मारले. मुरली विजयने आपल्या खेळीत १७० चेंडूंचा सामना करताना ८ चौकारांच्या साह्याने अर्धशतक झळकावले. रोहित शर्माने ३५ व अश्विने ४० धावांची खेळी केली.
विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे अपयशी : सलामीवीर मुरली विजय, पुजाराला वगळता इतर एकही फलंदाज धावा काढू शकला नाही. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११२ धावांची शतकी भागीदारी केली. त्या वेळी भारत मोठा स्कोअर करेल, असे वाटत होते. तेव्हा दोघांनी विकेट गमावल्या. कर्णधार विराट कोहली १० चेंडूपर्यंत खेळपट्टीवर टिकला. तो ९ धावा काढून बाद झाला. अजिंक्य रहाणेने १८, तर रोहित शर्माने ३५ धावांचे योगदान दिले.
अश्विन टॉपवर; रहाणे, कोहली मागे
रविचंद्रन अश्विनने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. त्याने आतापर्यंत या वर्षी भारताकडून सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. अश्विनने या वर्षी दोन शतकांसह एकूण २७३ धावा आणि १७ विकेट घेतल्या. कोहलीने कसोटीत या वर्षी आतापर्यंत २६० धावा, तर रहाणेने २६१ धावा काढल्या. या वर्षी सर्वाधिक धावा काढण्यात अश्विनने कोहली, रहाणेला मागे टाकले. कोहली, रहाणेला अपयश महागात पडले आहे.
फिरकीपटूंनी घेतल्या ५ विकेट
सामन्याचा पहिला दिवस असतानासुद्धा फिरकीपटूंना खेळपट्टीकडून मदत मिळत होती. न्यूझीलंडकडून फिरकीपटूंनी ५ गडी बाद केले. मिशेल सँटनरने ७७ धावांत ३ गडी बाद केले. याशिवाय ईश सोढी आणि मार्क क्रेग यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
तिसऱ्या सत्रात ट्रेंट बोल्ट चमकला
वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट न्यूझीलंडचा सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ५२ धावांत ३ गडी बाद केले. नील वॅग्नरने कोहलीची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. कोहली बाद होताच प्रेक्षक नाराज झाले. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने तिसऱ्या सत्रात आग ओकणारी गोलंदाजी केली. यामुळे तिसऱ्या सत्रात भारताने ३१ षटकांत १०६ धावांत तब्बल ५ विकेट गमावल्या.