आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • LIVE UPDATES India Vs. Australia, 2nd Test Day 4 At Bangalore M. Chinnaswamy Stadium

IND vs AUS: टीम इंडिया केव्हाही डसणारा साप, विराट कोहलीचे नॅथन लॉयनला प्रत्युत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॉस्ट्रेलियाच्या नॅथन लॉयनला स्वत:च्या गोलंदाजीवर झेलबाद केल्यानंतर विजय निश्चित होताच अश्विनने हवेत उडी मारून असा जोरदार जल्लोष केला. - Divya Marathi
अॉस्ट्रेलियाच्या नॅथन लॉयनला स्वत:च्या गोलंदाजीवर झेलबाद केल्यानंतर विजय निश्चित होताच अश्विनने हवेत उडी मारून असा जोरदार जल्लोष केला.
बंगळुरू - दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने कमाल प्रदर्शन करताना ७५ धावांनी रोमांचक विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचे अखेरचे ६ गडी अवघ्या ११ धावांच्या अंतरात बाद करून भारताने विजय आपल्या नावे केला. भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा २५ वा विजय ठरला. भारताच्या विजयाचा हीरो ठरला ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन. त्याने घातक गोलंदाजी करताना अवघ्या ४१ धावांत ६ गडी बाद केले. त्याच्या आधी चेतेश्वर पुजारा आणि रहाणे यांनी ११८ धावांची शतकी भागीदारी करून विजयाचा पायाचा रचला. या सामन्याच्या दोन्ही डावांत अर्धशतक ठोकणारा लोकेश राहुल “मॅन ऑफ द मॅच’ ठरला. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी केली आहे.  
भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १८८ धावांचे छोटे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन टीम ३५.४ षटकांत अवघ्या ११२ धावांत ढेर झाली. चहापानाच्या खेळानंतर थोड्या वेळातच ऑस्ट्रेलियाचा खुर्दा उडाला.   
 
शानदार खेळपट्टी :  चिन्नास्वामी स्टेडियमच्या  खेळपट्टीने फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजांना एकसमान मदत केली. दुसऱ्या डावात भारतीय फिरकीपटूंनी ७ विकेट (अश्विन ६, जडेजा १), तर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी ८ विकेट (हेझलवूड ६, स्टार्क २) घेतल्या.   
अश्विनच्या २५ व्यांदा ५ विकेट :  अश्विनने कसोटी करिअरमध्ये २५ व्यांदा ५ विकेट घेण्याची कामगिरी केली. त्याने सामन्यांत एकूण ८ गडी बाद केले. अश्विनने दुसऱ्या डावात डेव्हिड वॉर्नर (१७), पीटर हँडसकोम्ब (२४), मिशेल मार्श (१३), मॅथ्यू वेड (०), मिशेल स्टार्क (१), नॅथन लॉयन (२) यांना बाद केले.   
 
अश्विनने एकापाठोपाठ दिले धक्के... 
भारताने जेवणाच्या ब्रेकनंतर खेळण्यास आलेल्या ऑस्ट्रेलियाला एकापाठोपाठ एक धक्के दिले. चहापानाच्या ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाने ६ बाद १०१ धावा काढल्या होत्या. सलामीवीर रेनशॉला इशांत शर्माने विकेटकिपर वृद्धिमान साहाकरवी झेलबाद केले. यानंतर वॉर्नरला अश्विनने पायचित केले. उमेश यादवने शॉन मार्श (९) आणि स्टिव्नह स्मिथ (२८) यांना पायचित केले. स्मिथने ४८ चेंडूंत ३ चौकारांच्या साह्याने २८ धावा काढल्या. अश्विनने मिशेल मार्शला नायरकरवी झेलबाद करून १०१ च्या स्कोअरवर ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का दिला. ऑस्ट्रेलियाने उर्वरित ५ विकेट अवघ्या ११ धावांच्या अंतरात गमावल्या.   
 
पुजाराचे शतक हुकले :   तत्पूर्वी, भारताचा दुसरा डाव २७४ धावांत आटोपला. चेतेश्वर पुजाराने ९२ आणि अजिंक्य रहाणेने ५२ धावा काढल्या. वृद्धिमान साहाने नाबाद २० धावा काढल्या. ऑस्ट्रेलियाकडून वेगवान गोलंदाज हेझलवूडने ६७ धावांत ६ गडी बाद केले. स्टार्कने ७४ धावांत २, लेगस्पिनर ओकिफेने ३६ धावांत २ गडी बाद केले.  
 
"हा साप केव्हाही डसू शकतो'  
कोहलीला बाद करणे म्हणजे सापाचे धड वेगळे करण्यासारखे आहे, असे सामन्याआधी ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लॉयनने म्हटले होते. त्याचा अर्थ कोहली बाद होताच टीम इंडिया निर्जिव होते, असा होता. मात्र, टीम इंडिया केव्हाही डसणारा साप आहे, असे कोहलीने यावर उत्तर दिले.
 
अन् स्मिथवर कोहली भडकला
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात २१ व्या षटकात उमेश यादवचा एक चेंडू स्मिथच्या पॅडला लागला आणि पंचांनी त्याला बाद दिले. यानंतर स्मिथने डीआरएस घ्यायचा की नाही, हा निर्णय घेण्यासाठी ड्रेसिंग रूमकडे इशारा करून विचारले. स्मिथचे हे कृत्य बघून मैदानी पंच नायजल लोंंग यांनी त्याच्याशी बोलून त्याला मैदानाबाहेर जाण्यास सांगितले. इतक्यात भारतीय कर्णधार कोहलीसुद्धा तेथे पोहोचला. स्मिथच्या या कृत्यावर कोहली भडकला.
 
चार डावात चार गोलंदाजांच्या नावे ६ पेक्षा अधिक बळी
{ इतिहासात प्रथमच एका कसोटीच्या चार डावांत चार वेगवेगळ्या गोलंदाजांनी ६ किंवा त्यापेक्षा अधिक गडी बाद करण्याची कामगिरी केली. या कसोटीत नॅथन लॉयन, रवींद्र जडेजा, जोश हेझलवूड आणि आर. अश्विन यांनी ही कामगिरी केली.  
 
जडेजाची अप्रतिम गोलंदाजी   
जडेजाने ८ षटके गोलंदाजी केली. यात ५ षटके निर्धाव टाकून ३ धावांत १ विकेट 
घेतली. जडेजाने ४८ चेंडूंपैकी तब्बल ४५ चेंडू निर्धाव टाकले.    
 
 
- ८७ धावांनी पहिल्या डावात मागे पडल्यानंतर सुद्धा टीम इंडियाने विजय मिळवला. सर्वाधिक २७४ धावांनी पहिल्या डावात मागे पडूनही (२००१, वि. ऑस्ट्रेलिया) विजयााचा विक्रम भारताचाच आहे.  
- नंबर वनची क्रमवारी, ६.६७ कोटी सुरक्षित  : 
मालिकेतील पुढच्या दोन कसोटीचा काहीही निकाल लागला तरीही टीम इंडियाचे नंबर वन रँकिंग आणि आयसीसीकडून कसोटी गदा, १ मिलियन डॉलर (जवळपास ६.६७ कोटी रु.) मिळणे निश्चित आहे.  
 
पुजारा प्रथमच नव्वदीत बाद : कसोटीत १० शतके ठोकल्यानंतर चेतेश्वर पुजारा करिअरमध्ये प्रथमच नव्वदीत बाद झाला.
 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, बंगळुरू कसोटीतील क्षणचित्रे...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...