चेन्नई- सलामीवीर लोकेश राहुल (९६) आणि कर्णधार चेतेश्वर पुजाराच्या (५५) शानदार अर्धशतकी खेळीच्या बळावर भारत अ संघाने ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध सुरू असलेल्या चारदिवसीय अधिकृत नसलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी जोरदार झुंज दिली. भारताने ७७.१ षटकांत ६ बाद २२१ धावा काढल्या.
लोकेश राहुलचे शतक थोडक्याने हुकले. सलामीला आलेल्या राहुलने १८५ चेंडूंचा सामना करताना १४ चौकारांच्या साहाय्याने शानदार ९६ धावा काढल्या. त्याच्या सोबतीला आलेला दुसरा सलामीवीर अभिनव मुकुंद मोठी खेळी करू शकला नाही. मुकुंद अवघ्या ९ धावा काढून फेकेतेच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. तो बाद झाल्यानंतर राहुल आणि कर्णधार पुजारा यांनी भारताचा डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी केली. भारताच्या १२७ धावा झाल्या असताना पुजारा बाद झाला. पुजाराने १२२ चेंडूंचा सामना करताना ७ चौकारांच्या मदतीने ५५ धावा जोडल्या. पुजारा बाद होताच भारताचा डाव गडगडला. चौथ्या स्थानावरील करुण नायरला तर भोपळासुद्धा फोडता आला नाही. यानंतर श्रेयसने राहुलसोबत खिंड लढवली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली. भारताचा डाव सावरतोय असे वाटत असतानाच श्रेयस अय्यर बाद झाला. त्याने ५८ चेंडूंत ७ चौकारांसह ३९ धावा काढल्या.
राहुलच्या ९६ धावा
लोकेश राहुल पाचव्या फलंदाजाच्या रूपाने बाद झाला. तो शतक झळकावेल असे वाटत होते. मात्र, त्याचे शतक अवघ्या ४ धावांनी हुकले. राहुल ९६ धावांवर असताना अॅबोटने त्याला उस्मान ख्वाजाकरवी झेलबाद करून सर्वात मोठा अडथळा दूर केला. राहुल बाद झाला त्या वेळी भारताच्या २१४ धावा झाल्या होत्या. राहुलच्या या दमदार खेळीमुळे श्रीलंकेविरुद्ध दौऱ्यासाठी त्याने आपला दावा सिद्ध केला आहे.