आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Win In Saiyad Mushtak Ali T 20 Cricket

सय्यद मुश्ताक अली टी-20: महाराष्ट्राचा विजय; सेनादलाचा पराभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कटक- यष्टिरक्षक फलंदाज निखिल नाईकचे (६९) आक्रमक अर्धशतक आणि स्वप्निल गुगळे (३ विकेट), काझी (३ विकेट), श्रीकांत मुंढे (२ विकेट) अाणि मुथुस्वामीच्या (२ विकेट) यांच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर महाराष्ट्राने सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत रविवारी सेनादलाला ३१ धावांनी पराभूत केले. महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १५९ धावा काढल्या. यानंतर महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी सेनादलाला १८.३ षटकांत सर्वबाद १२८ धावांवर रोखून विजय मिळवला. स्पर्धेत हा महाराष्ट्राचा पहिला विजय ठरला. शनिवारी महाराष्ट्राचा उत्तर प्रदेशकडून पराभव झाला होता.

धावांचा पाठलाग करताना सेनादलाकडून रजत पल्लीवालने २५ तर सुमीत सिंगने २४ धावांचे योगदान दिले. स्वाइनने २७ धावा जोडल्या. इतर फलंदाजांनी निराशा केली. नीरज वर्माने १९ तर यशपालसिंगने १२ धावांचे योगदान दिले. महाराष्ट्राकडून स्वप्निल गुगळे आणि काझी यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. डाॅमिनिक मुथुस्वामी आणि श्रीकांत मुंढे यांनी प्रत्येकी दोघांना टिपले.

निखिलचे अर्धशतक :
तत्पूर्वी, महाराष्ट्राने निखिल नाईकच्या वेगवान अर्धशतकाच्या बळावर १५९ धावंाचा टप्पा गाठला. महाराष्ट्राने या सामन्यात मोटवाणीला बाहेर करताना निखिलला संधी दिली. हा बदल योग्य ठरला. निखिलने निवड सार्थ ठरवताना अर्धशतक ठोकले. सलामीवीर गुगळे ३ तर हर्षद खडीवालेने १० धावा जोडल्या. महाराष्ट्र संघ २ बाद १७ असा अडचणीत सापडला असताना कर्णधार केदार जाधव आणि निखिल यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५९ धावा जोडल्या. केदार जाधवने ३० चेंडूंत १ षटकार आणि ३ चौकारांसह ३६ धावांचे योगदान दिले. निखिलने ४६ चेंडंूत २ षटकार आणि ८ चौकारांसह ६९ धावा झोडल्या. भाटीने १३ तर अंकित बावणेने ६ धावा काढल्या. श्रीकांत मुंढेने ११ धावा जोडल्या. इतर फलंदाजांना मात्र, समाधानकारक खेळी करता अाली नाही.