आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवीण तांबेची गुगली; फिक्सरसोबत खेळला, एमसीएकडून तांबेला कारणे दाखवा नोटीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- मुंबईचा क्रिकेटपटू आणि आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा खेळाडू प्रवीण तांबे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बांगलादेशचा निलंबित क्रिकेटपटू मोहंमद अश्रफुलसोबत अमेरिकेत एका टी-२० सामन्यात खेळल्याचा आरोप तांबेवर आहे. प्रवीण तांबे यापूर्वी मॅच फिक्सिंग प्रकरणात एका क्रिकेटपटूकडून (हिकेन शहा) संपर्क साधल्यामुळे चर्चेत आला होता.

मुंबई क्रिकेट संघटनेने या प्रकरणी तांबेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तांबेने या स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी मुंबई क्रिकेट संघटनेची परवानगी घेतलेली नाही, असे एमसीएने सांगितले. २०१३ मध्ये बांगलादेश प्रीमियर लीगदरम्यान मॅच फिक्सिंगचे आरोप लागल्यानंतर मोहंमद अश्रफुलवर बांगलादेश क्रिकेट मंडळाने ५ वर्षांसाठी बंदी घातली होती.

प्रवीण तांबेशिवाय बांगलादेश क्रिकेट संघाचे सदस्य इलियास सनी आणि नादिफ चौधरी यांनीसुद्धा अमेरिकेत झालेल्या या टी-२० स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी क्रिकेटपटूंनी काहीच सांगितले नाही. यामुळे या प्रकरणाची चौकशी होईल, असे बीसीबीने सांगितले. न्यूजर्सी येथे झालेल्या लॉरेल हिल क्रिकेट टी-२० स्पर्धेच्या संकेतस्थळावर तांबेचा उल्लेख आहे. या स्पर्धेत प्रवीण तांबे साऊथ गुजरात सीसी ज्युनियर्स संघाकडून २७ जुलै रोजी अश्रफुलसोबत खेळला होता.

तांबेचे स्पष्टीकरण
ही स्पर्धा अनधिकृत असल्याचे मला माहीत नव्हते, असे तांबेने सांगितले. अमेरिकेत एक आठवडा सुट्या घालवण्यासाठी मित्रांसह गेलो होतो. माझ्याकडे क्रिकेटची किटसुद्धा नव्हती. मी ३१ जुलैपर्यंत अमेरिकेत होतो. २७ जुलै रोजी मला मित्रांनी तो सराव सामना असल्याचे सांगितले. मी खेळण्यासाठी मैदानावर उतरलो तर मो. अश्रफुल या स्पर्धेत सहभागी आहे हे मला माहिती नव्हते. अश्रफुल हा सामना खेळत आहे हे माझ्या मित्रांनासुद्धा माहिती नव्हते, असे स्पष्टीकरण तांबेने दिले.
बातम्या आणखी आहेत...