मुंबई - अंबाती रायडूचे (१००) शतक, युवराजसिंग (५६) आणि महेंद्रसिंग धोनीच्या (६८) अर्धशतकी खेळीनंतरही भारतीय अ संघाला इंग्लंडविरुद्ध सराव सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. भारत अ संघाने ५० षटकांत ७ बाद ३०४ धावांचा डोंगर उभा केला. मात्र, इंग्लंडने हे लक्ष्य ४८.५ षटकांत ७ विकेटच्या मोबदल्यात सहज गाठले. जेसन रॉय (६२), सॅम बिलिंग्स (९३), जोस बटलर (४६) आणि डॉसन (४१) हे विजयाचे शिल्पकार ठरले. अाता गुरुवारी दुसरा सामना रंगणार अाहे.
धावांचा पाठलाग करताना इंग्लंडकडून जेसन रॉय-अॅलेक्स हेल्स यांनी १४.३ षटकांत ९५ धावांची मजबूत सलामी दिली. हेल्स ४० धावा काढून बाद झाला. जेसन रॉयने ५७ चेंडूंत २ षटकार, ९ चौकारांसह ६२ धावांची खेळी केली. इंग्लंडचा कर्णधार मोर्गन अवघ्या ३ धावांवर बाद झाला. मात्र, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या सॅम बिलिंग्सने ९३ धावांची खेळी करून इंग्लंडचा विजय सोपा केला. जोस बटलरने ४६ आणि डॉसनने ४१ धावांची खेळी करून त्याला चांगली साथ िदली. बिलिंग्सने ८५ चेंडूंत ८ चौकारांसह ९३ धावा कुटल्या. त्याचे शतक ७ धावांनी हुकले.
तत्पूर्वी, शिखर धवन, युवराज आणि कर्णधार धोनीच्या खेळीमुळे भारत अ संघाने ५ बाद ३०४ धावा काढल्या. रायडूने ९७ चेंडंूत १०० धावा काढताना १० चौकार आणि १ षटकार मारला. शतक पूर्ण होताच रायडू निवृत्त झाला. मनदीपसिंग (८) लवकर बाद झाल्यानंतर धवन-रायडूने दुसऱ्या विकेटसाठी १११ धावांची भागीदारी केली. धवनने फॉर्म परत मिळवताना ८४ चेंडूंत ६३ धावा काढल्या. त्याने ८ चौकार, १ षटकार मारला. तीन वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन करणारा युवराजने ४८ चेंडूंत २ षटकार, ६ चौकारासंह ५६ धावांची खेळी केली.
धोनीने ४० चेंडूंत ६८ धावांची खेळी केली. यात धोनीने २ षटकार आणि ८ चौकार मारले. धोनीने अखेरच्या षटकात वोक्सच्या गोलंदाजीवर एकूण २३ धावा ठोकल्या. या षटकात त्याने ६,४, ४, २, ६, १ अशा धावा काढल्या.
संक्षिप्त धावफलक : भारत अ संघ : ५ बाद ३०४. इंग्लंड : ७ बाद ३०७.
पुढे स्लाईडवर पाहा, भारत-A विरुद्ध इंग्लंड सामन्याशी संबंधित फोटोज....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)