आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या विजयात पार्थिव, बुमराह, कृणाल चमकले! मुंबईकडून राणाने केल्या सर्वाधिक 45 धावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- इंडियन प्रीमियर लीगमध्ये बुधवारी मुंबई इंडियन्सने दमदार कामगिरी करताना गतचॅम्पियन सनरायझर्स हैदराबादला ४ विकेटने नमवले. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या ३ विकेटनंतर पार्थिव पटेल, नितीश राणा आणि कृणाल पंड्याच्या शानदार फलंदाजीच्या बळावर मुंबईने हैदराबादचा विजयी रथ रोखला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १५८ धावा काढल्या. मुंबईने १८.४ षटकांत ६ बाद १५९ धावा काढून विजय मिळवला.

मुंबईकडून धावांचा पाठलाग करताना सलामीवीर विकेटकीपर पार्थिव पटेलने ३९ धावांची खेळी केली. पार्थिवने २४ चेंडूंत ७ चौकार मारले. याशिवाय नितीश राणाने ३६ चेंेडूंत २ षटकार, ३ चौकारांसह सर्वाधिक ४५ धावा तर युवा खेळाडू कृणाल पंड्याने २० चेंडूंत ३ षटकार, ३ चौकार मारून विजयात योगदान दिले.

मुंबईकडून बटलर १४, रोहित ४, पोलार्ड ११ हे दिग्गज खेळाडू अपयशी ठरले. तरीही युवांनी विजय मिळवून दिला. तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादने सलामीवीर शिखर धवनच्या ४८ आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या ४९ धावांच्या बळावर १५८ धावा काढल्या. हैदराबादच्या इतर फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केले. दीपक हुड्डा ९, युवराजसिंग ५, नमन ओझा ९, विजय शंकर १ धावा काढून बाद झाले. बेन कटिंगने २० धावांचे योगदान दिले. मुंबईकडून बुमराहने २४ धावांत ३ गडी बाद केले.

बुमराह ठरला सामनावीर
मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. बुमराहने शानदार गोलंदाजी करून हैदराबादला कमी धावसंख्येत रोखण्यात योगदान दिले. त्याने ४ षटकांत २४ धावांत ३ गडी बाद केले. बुमराहने बेन कटिंग, नमन ओझा आणि रशीद खान यांना बाद केले. त्याने २४ पैकी तब्बल ९ चेंडू निर्धाव टाकले. 

भज्जी चमकला
मुंबईकडून हरभजनसिंगने ४ षटकांत २३ धावांत २ गडी बाद केले. भज्जीने वॉर्नर आणि हुड्डा यांच्या विकेट घेतल्या. हार्दिक पंड्याने १ विकेट घेतली.
बातम्या आणखी आहेत...