आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Seal 41st Ranji Trophy Title With Innings Win

रणजी ट्राॅफी क्रिकेट स्पर्धा : मुंबई ४१ व्यांदा चॅम्पियन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - फाॅर्मात असलेल्या मुंबई संघाने शुक्रवारी ४१ व्या विक्रमी रणजी विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. या टीमने सौराष्ट्राचा १ डाव २१ धावांनी पराभव केला. पुण्याच्या गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या रणजी क्रिकेटच्या अंतिम सामन्यात मुंबईने सौराष्ट्राचा अवघ्या अडीच दिवसांतच फडशा पाडला. युवा गोलंदाज शार्दूल ठाकूरने सौराष्ट्राचा निम्मा संघ २६ धावांत गुंडाळल्यामुळे साैराष्ट्रचा दुसऱ्या डावात ११५ धावांत धुव्वा उडाला. अंतिम सामन्यात एकमेव शतक ठोकणारा मुंबईचा श्रेयस अय्यर सामनावीर ठरला.

मुंबईचे माजी कप्तान व कसोटीवीर सुधीर नाईक यांनी या विजेतेपदामुळे आनंद झाल्याचे म्हटले आहे. अलीकडे आपण सातत्याने जिंकत नव्हतो त्यामुळे या विजयाचे महत्त्व मोठे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यंदाच्या हंगामात धावांचे सातत्य राखणाऱ्या श्रेयस अय्यरला यंदाच्या कामगिरीवर भारताच्या संघात आता तरी स्थान मिळायला हवे, असेही त्यांनी म्हटले आहे. शिवाय अंतिम सामन्यात पहिल्या डावात शेवटच्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी करताना ८८ धावा काढणाऱ्या सिद्धेश लाडचेही कौतुक व्हायला हवे, असेही त्यांनी म्हटले आहे. कारण सुरुवातीच्या सामन्यात अशा हातून निसटत असलेल्या लढती लाडच्या कामगिरीमुळे मुंबईच्या बाजूस झुकल्या होत्या. शार्दूल ठाकूर, बलविंदर संधू या गोलंदाजांचीही त्यांनी स्तुती केली आहे. २०१२-१३ मध्येही मुंबईने अंतिम फेरीत सौराष्ट्रावर १ डाव १२५ धावांनी विजय मिळवून रणजी विजेतेपद पटकावले होते.

विजेत्या संघाला २ कोटींचा पुरस्कार : दिलीप वेंगसरकर
४१ वे रणजी विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई संघाचे अभिनंदन करून उपाध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी संघासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने २ कोटी रुपयांच्या पुरस्काराचीही घोषणा केली आहे. मुंबईच्या यशात खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, मुंबई क्रिकेट संघटना आणि तमाम मुंबईकरांचा हात असल्याचे म्हटले आहे.

शार्दूल ठाकूरचे शानदार पाच बळी
तिसऱ्या दिवसाच्या खेळाचे मानकरी होते दोन मुंबईकर, ८८ धावा फटकावून मुंबईला शतकी आघाडी मिळवून देण्यात सिद्धेश लाडचा मोठा वाटा होता. ९ बाद २६८ वरून सिद्धेश लाडने बलविंदर संधू (३४)च्या साथीने शेवटच्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी केली. यामुळेच मुंबईला पहिल्या डावात १३६ धावांची १ आघाडी मिळाली. त्यानंतर शार्दूल ठाकूरने २६ धावांत ५, तर धवल कुलकर्णी व बलविंदर संधू यांनी प्रत्येकी २-२ बळी घेत सौराष्ट्र टीमचा दुसरा डाव ११५ धावांत गुंडाळला.

जेतेपदाचा आनंद
विजयाचा आनंद शब्दांत वर्णन करता येणार नाही. रणजी स्पर्धा जिंकणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते, ते आज साकारले. यंदा अधिक जोर लावला आणि १३०० धावा केल्या. मात्र संघाला विजेतेपद मिळवता आले. - श्रेयस अय्यर, कर्णधार, मुंबई

ती चूक महागात
अंतिम फेरीपर्यंत मजल मारली हेही कौतुकास्पद आहे. मात्र, आम्ही सोडलेले झेल महागात पडले. त्यामुळे पराभवाला सामाेरे जावे लागले. सिद्धेशने शेवटच्या विकेटसाठी केलेली शतकी भागीदारी मुंबईला निर्णायक आघाडी देऊ शकली. - जयदेव शहा, कर्णधार,साैराष्ट्र

साैराष्ट्रला दुसऱ्यांदा हरवले
मुंबईने साैराष्ट्रला फायनलमध्ये दुसऱ्यांदा पराभूत केले. यापूर्वी २०१२-१३ च्या सत्रात मुंबईने साैराष्ट्रवर १२५ धावांनी मात करून ४० व्यांदा जेतेपद मिळवले हाेते.