आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • New Zealand Tour Of India, 3rd ODI: India V New Zealand At Mohali, Oct 23, 2016

IND vs NZ: कोहली, धोनीची मोहालीत आतषबाजी; टीम इंडिया मालिकेत 2-1 ने पुढे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहाली- भारताची रनमिशन विराट कोहलीचे शतक (नाबाद १५४) आिण कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (८०) खेळीच्या बळावर टीम इंडियाने मोहालीत न्यूझीलंडला ७ विकेटने हरवले. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ४९.४ षटकांत सर्वबाद २८५ धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारताने ४८.२ षटकांत ३ विकेटच्या मोबदल्यात २८९ धावा काढून लक्ष्य गाठले. मालिकेतील चौथा सामना धोनीचे शहर रांची येथे २६ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर अजिंक्य रहाणे १० चेंडूंत ५ धावा काढून तिसऱ्या षटकात हेनरीच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर रोहित शर्मासुद्धा १३ धावा काढून नवव्या षटकात साऊथीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. रोहित बाद झाल्यानंतर भारतीय संघ अडचणीत आला होता. यानंतर विराट कोहली आणि कर्णधार धोनीने तिसऱ्या विकेटसाठी २७.१ षटकांत १५१ धावांची भागीदारी करून डाव सावरला. दोेघे शतकाकडे वाटचाल करत असताना धोनी बाद झाला. धोनी ८० धावांवर असताना हेनरीने त्याला रॉस टेलरकरवी झेलबाद केले. यानंतर कोहलीने १०४ चेंडूंत १०० धावा पूर्ण केल्या. कोहलीचे हे वनडेतील हे २६ वे शतक ठरले.

कोहलीचे नाबाद दीडशतक
धोनी बाद झाल्यानंतर कोहलीने जबाबदारी घेत नाबाद राहून विजयावर शिक्कामोर्तब केले. कोहलीने १३४ चेंडूंत १ षटकार, १६ चौकारांसह नाबाद १५४ धावा ठोकल्या. मनीष पांडेने नाबाद २८ धावांचे योगदान दिले. कोहली-मनीष पांडेने चौथ्या विकेटसाठी १२.३ षटकांत ७.७६ च्या रनरेटने नाबाद ९७ धावांची भागीदारी केली.
विराट कोहलीचा विक्रमांचा पाऊस
> या खेळीनंतर कोहलीच्या नावे वनडेत ७४६० धावा झाल्या आहेत. त्याने पाकिस्तानच्या जावेद मियाँदादला (७३८१) मागे टाकले.
> कोहलीने डे-नाइट सामन्यात धावांचा पाठलाग करताना १५ वे शतक ठोकले. पाठलाग करताना डे-नाइट सामन्यात इतर एकाही फलंदाजाला १० शतकेसुद्धा काढता आलेली नाहीत. कोहलीने डे-नाइट सामन्यात पाठलाग करताना ३३ व्या वेळी ५०+ स्कोअर केला. यात फक्त सचिन (३४ वेळा) पुढे आहे. शिवाय कोहली धावांचा पाठलाग करताना भारताकडून विजयात सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबत सचिनच्या बरोबरीत आला आहे. दोघांनी पाठलाग करताना भारताच्या विजयात १४ शतके ठोकली आहेत.
> कोहलीने या सामन्यात आपल्या वनडे करिअरमधील दुसरी मोठी खेळी केली. त्याची सर्वोत्तम खेळी १८३ धावा (वि. पाकिस्तान) आहे.
> कोहली २२ व्यांदा मॅन ऑफ द मॅच बनला. २१ खेळाडू अजून कोहलीच्या पुढे आहे. सचिन (६२ वेळा) सर्वांत पुढे आहे. चार भारतीय सचिन, गांगुली (३१), युवराज (२५) आणि सेहवाग (२३) कोहलीच्या पुढे आहेत.

धोनीच्या नावे दोन विक्रम
१५० यष्टिचीत करणारा पहिला विकेटकीपर : धोनीने या सामन्यात दोन यष्टिचीत केले. यासह तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १५१ यष्टिचीत करणारा खेळाडू ठरला. १५० यष्टिचीतचा आकडा अोलांडणारा तो जगातला एकमेव आहे. १३९ यष्टिचीतसह लंकेचा संगकारा दुसऱ्या स्थानी आहे.

९००० वनडे धावा : या डावात २२ वी धाव घेताच धोनीने वनडेत ९ हजार धावांचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा तो जगातला १७ वा, तर भारताचा पाचवा क्रिकेटपटू आहे. विकेटकीपर म्हणून ९ हजार धावा काढणारा तो तिसरा खेळाडू आहे. त्याच्या पुढे कुमार संगकारा (१३३४१) आणि अॅडम गिलख्रिस्ट (९४१०) आहेत. ५० च्या सरासरीने ९ हजार धावा काढणारा धोनी पहिला फलंदाज आहे.

०१ वर्ष :१३ सामने, १० डावांनंतर धोनीने अर्धशतक काढले. याआधी त्याने १४ ऑक्टोबर २०१५ रोजी इंदूर येथे द. आफ्रिकेविरुद्ध अर्धशतक काढले होते.

टॉम लँथमचे अर्धशतक
टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने ४९.४ षटकांत सर्वबाद २८५ धावा काढल्या. न्यूझीलंडचा संघ २ चेंडू आधी सर्वबाद झाला. पाहुण्या संघाकडून टॉम लँथम (६१) आणि जिमी निशाम (५७) यांनी अर्धशतके ठोकली. या दोघांच्या खेळीमुळे न्यूझीलंडला सन्मानजनक स्कोअर उभारता आला. सलामीवीर मार्टिन गुप्तिल (२७) आणि लँथम यांनी ४६ धावांची सलामी दिली. यानंतर कर्णधार केन िवल्यम्सनने (२२) स्थिरावण्याचा प्रयत्न केला. गुप्तिल, विल्यम्सन बाद झाल्यानंतर लँथमला रॉस टेलरने (४४) चांगली साथ दिली. नंतर निशामने (५७) तळाचा फलंदाज मॅट हेनरीसोबत (नाबाद ३९) नवव्या विकेटसाठी ७.५२ च्या रनरेटने ८४ धावांची भागीदारी केली.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, IND vs NZ: सामन्यातील काही क्षणचित्रे...
बातम्या आणखी आहेत...