आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूझीलंडची श्रीलंकेवर ९ विकेटने मात, गपटिल, मुन्रोची वेगवान अर्धशतके

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑकलंड - मार्टिन गुप्तिल (६३) व कॉलिन मुन्रो (५०) यांच्या वेगवान अर्धशतकाच्या बळावर न्यूझीलंडने दुसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेवर ९ विकेटने विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने दोन टी-२० सामन्यांची मालिका २-० ने जिंकली. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १४२ धावा काढल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने गुप्तिल, मुन्रोच्या वेगवान फलंदाजीमुळे अवघ्या १० षटकांत १ बाद १४७ धावा काढून विजयश्री मिळवली.

पाठलाग करताना न्यूझीलंडकडून मार्टिन गुप्तिलने अवघ्या १९ चेंडूंत ५० धावा काढून अर्धशतक ठोकले. न्यूझीलंडकडून टी-२० मधील हे वेगवान अर्धशतक ठरले. त्याचा हा विक्रम अवघी २० मिनिटे राहिला. त्यानंतर लगेच कॉलिन मुन्रोने १४ चेंडूंत ५० धावा ठोकून न्यूझीलंडकडून टी-२० मध्ये वेगवान अर्धशतकाचा विक्रम आपल्या नावे केला. गुप्तिलने ५० धावांत ३ षटकार व ६ चौकार मारले, तर मुन्रोने ५० धावांत ७ षटकार व १ चौकार खेचला. दोघांच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडच्या ५० धावा ३.४ षटकांत, १०० धावा ७.३ षटकांत, तर विजयी लक्ष्य १० षटकांत पूर्ण झाले. कर्णधार विल्यम्सनने २१ चेंडूंत ३२ धावा काढल्या.

सिरिवर्धनेच्या ८१ धावा
श्रीलंकेने सिरिवर्धनेच्या ८१ व दिलशानच्या २८ धावांच्या बळावर १४२ धावा काढल्या. इतर फलंदाज अपयशी ठरले. सिरिवर्धनेने ४९ चेंडूंत ४ षटकार, ७ चौकारांच्या साह्याने ८१ धावा चोपल्या. न्यूझीलंडकडून ग्रँट इलियटने ४ तर मिल्नेने २ गडी बाद केले.