आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर. अश्विन-जडेजाचे यश : 14 वर्षांत प्रथमच दोन फिरकीपटू एकत्र नंबर वन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर. अश्विन, रवींद्र जडेजा - Divya Marathi
आर. अश्विन, रवींद्र जडेजा
दुबई - टीम इंडियाचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि लेगस्पिनर रवींद्र जडेजा कसोटी क्रमवारीत संयुक्तपणे नंबर वन गोलंदाज बनले आहेत. १४ वर्षांच्या इतिहासात प्रथमच दोन फिरकीपटू संयुक्तपणे क्रमवारीत टॉपवर आले आहेत. अश्विन आधीपासूनच नंबर वन गोलंदाज होता. आता जडेजासुद्धा त्याच्या बरोबरीत येऊन पोहोचला आहे. आयसीसीच्या क्रमवारीला २००३ ला सुरुवात झाली. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरू कसोटीत जडेजाने पहिल्या डावात ६ विकेट घेतल्या होत्या, तर अश्विनने दुसऱ्या डावात ६ गडी बाद करून भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला. अश्विनने दुसऱ्या डावात सहा विकेट घेतल्या नसत्या तर जडेजा क्रमवारीत त्याच्या पुढे निघाला असता. अश्विन, जडेजा या दोघांच्या नावे आता प्रत्येकी ८९२ गुण आहेत. दोन्ही खेळाडू नंबर वनच्या खुर्चीवर कायम राहण्यासाठी प्रयत्न करतील, याचा टीम इंडियाला फायदा होईल. क्रमवारीत दुसरा क्रमांक नसून ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने बंगळुरू कसोटीत भारताच्या दुसऱ्या डावात ६ गडी बाद केले होते.   
 
मुरलीधरन-स्टेन २००८ मध्ये होते क्रमवारीत टॉपवर    
श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन आणि द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन हे दोघे कसोटी इतिहासात पहिल्यांदाच २००८ मध्ये संयुक्तपणे नंबर वन गोलंदाज बनले होते. त्यानंतर प्रथमच अश्विन-जडेजाची जोडी नंबर वन बनली आहे. या वेळी टीम इंडियाच्या दोन गोलंदाजांनी ही कामगिरी केली आहे.  
 
अष्टपैलूंत अश्विनची घसरण
आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अश्विनची नंबर वनच्या सिंहासनावरून घसरण झाली आहे. आता बांगलादेशचा सकिब-अल-हसन नंबर वन अष्टपैलू खेळाडू आहे. अश्विन दुसऱ्या तर जडेजा तिसऱ्या  क्रमांकावर आहे. मिशेल स्टार्क चौथ्या, बेन स्टोक्स पाचव्या स्थानी आहेत.
 
कोहली तिसऱ्या क्रमांकावर घसरला...
आयसीसी कसोटी फलंदाजाच्या क्रमवारीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे नुकसान झाले आहे. मालिका सुरू होण्याआधी कोहली दुसऱ्या क्रमांकावर होता. आता कोहली तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथ नंबर वन फलंदाज असून इंग्लंडचा रुट दुसऱ्या स्थानी आहे. कोहलीने या मालिकेत अवघ्या ४० धावा काढल्या.
 
पुजाराची प्रगती : भारताच्या चेतेश्वर पुजाराने बंगळुरूत ९२ धावांची खेळी केली. पुजाराने या खेळीच्या बळावर क्रमवारीत ५ स्थानांची प्रगती करताना टाॅप-१० मध्ये पुन्हा प्रवेश केला. पुजारा सहाव्या  क्रमांकावर पोहोचला आहे. भारतीय खेळाडूंत रहाणे आणि राहुल यांचीही प्रगती झाली.
 
बीसीसीआय-ऑस्ट्रेलियन बोर्ड आले समोरासमोर
मेलबर्न/नवी दिल्ली - बंगळुरू कसोटीत डीआरएसबाबत भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही संघांनंतर आता दोन्ही देशांची क्रिकेट मंडळेही समोरासमोर आले आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईअो जेम्स सदरलँड यांनी विराट कोहलीने स्टीव्हन स्मिथवर लावलेल्या आरोपांना चुकीचे म्हटले, तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विराट कोहलीचे समर्थन केले आहे. 
 
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथच्या प्रामाणिकपणावर निर्माण होणा ऱ्या प्रश्नांना सदरलँड यांनी फेटाळले. संघाच्या निष्ठेबाबत कोणीच प्रश्न निर्माण करू शकत नाही, असे त्यांनी नमूद केले. दुसरीकडे बीसीसीआयने या सामन्याचे व्हिडिओ बरेचदा बघितल्यानंतर कोहलीचे समर्थन करण्याचा निर्णय घेतला. कोहली एक परिपक्व क्रिकेटपटू असून मैदानावर त्याची वागणूक चांगली होती, असे बीसीसीआयने म्हटले.   

उमेश यादवने पायचीत केल्यानंतर पंचांनी स्मिथला बाद दिले. यानंतर स्मिथने ड्रेसिंग रूमकडे इशारा करून डीआरएसबाबत विचारणा केली. यानंतर वाद सुरू झाला. आयसीसीने याप्रकरणी कोहली, स्मिथवर कारवाई होणार नसल्याचे सांगितले आहे.
बातम्या आणखी आहेत...