आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांची भूमिका निर्णायक, बीसीसीआय अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या निधनामुळे रिक्त झालेले संघटनेचे अध्यक्षपद पटकावण्यासाठी विविध इच्छुकांनी आपापले संख्याबळ चाचपण्यास सुरुवात केली असून माजी अध्यक्ष शरद पवार यांची एन. श्रीनिवासन यांच्याशी नागपूर येथे झालेली अचानक भेट हा त्याचाच एक भाग आहे. सध्या शरद पवार यांच्याकडे स्वत:चे संख्याबळ आहे २९ पैकी सहा मतांचे. मात्र, ही सहा मते असणारे शरद पवारच १३ मते असणारे एन. श्रीनिवासन आणि १० मते असणारे भाजप यांच्यापैकी एकाच्या साथीने अध्यक्ष होऊ शकतात.

एन. श्रीनिवासन यांना न्यायालयाच्या सूचनेमुळे स्वत: अध्यक्षपदाच्या शर्यतीत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे आतापर्यंत श्रीनिवासन यांच्याशी एकनिष्ठ असलेले अमिताभ चौधरी यांचे नाव पूर्व विभागाकडून पुढे येत आहे. पूर्व विभागाची मते आणि दक्षिण विभागाची मते यांची जुळवाजुळव करून त्यांना बीसीसीआयचे अध्यक्ष होण्याचे स्वप्न पाहता येईल.

१० मते असणारा भाजप सध्या तरी तटस्थ असला तरीही अनुराग ठाकूर यांना मोठे करण्याची योजना ऐन वेळी शिजली तर पुन्हा एकदा पवारांची भूमिकाच निर्णायक ठरणार आहे. सौरव गांगुलीला बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष करून दालमियांची गादी पटकावण्याचा प्रयत्न निष्फळ आहे. कारण बीसीसीआयच्या घटनेनुसार त्या पदासाठीच्या उमेदवाराने बीसीसीआयच्या दोन वार्षिक सभा आयोजित करणे आवश्यक आहे. माजी कर्णधार सौरव गांगुली तेथेच बाद ठरतो.

राजीव शुक्ला किंवा अन्य उमेदवारांची नावे सध्या पुढे येत असली तरीही शेवटी शरद पवार हेच निवडणुकीची गणिते ठरवणार आहेत. अरुण जेटलींचा विरोध आणि श्रीनिवासन समर्थकांचे मतपरिवर्तन करण्यात पवार यशस्वी ठरले तरच महाराष्ट्राकडे बीसीसीआयचे अध्यक्षपद पुन्हा येऊ शकेल. एकूणच सर्व दिग्गज जोरदार तयार करीत असून, क्रिकेटकिंग पवार यांच्या चालींकडे सर्वांचे लक्ष आहे.
सौरव गांगुली बंगाल क्रिकेटचा झाला अध्यक्ष
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली क्रिकेट असोसिएशन आॅफ बंगाल (कॅब) चा अध्यक्ष बनला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी याची घोषणा केली. याआधी गांगुली कॅबमध्ये सचिव होता. बंगाल सरकारचा पाठिंबा असल्याने गांगुलीची अध्यक्षपदी निवड होणे निश्चित होते. बुधवारीच गांगुलीने ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती.
श्रीनिवासन-शरद पवार यांची नागपूरात झाली भेट
आयसीसीचे चेअरमन आणि तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन आणि शरद पवार यांची नागपुरात भेट झाली. पवारांना भेटण्यासाठी श्रीनिं खास नागपुरात आले. बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी दोघांची भेट महत्त्वपूर्ण ठरेल.

बीसीसीआयचा अध्यक्ष सहमतीने व्हावा : पवार
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन यांनी बुधवारी रात्री नागपुरात आपली भेट घेऊन चर्चा केल्याचे मान्य करून पवार म्हणाले की, या भेटीत कुठल्याही नावाची चर्चा झाली नाही. भारतीय क्रिकेट मंडळातील सध्याचे वातावरण पाहता सर्वसहमतीने कोणीही अध्यक्ष होणार असेल तर बरे एवढीच आपली भूमिका मांडल्याचे पवार म्हणाले. पवार आणि श्रीनिवास यांच्या भेटीने बीसीसीआय अध्यक्षपदासाठी महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकतो. या दोघांची भूमिका, पाठिंबा नवा अध्यक्ष ठरवण्यासाठी निर्णायक ठरेल.