आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी ‘टेस्ट’, आजपासून ‘डे-नाइट’ कसोटी, गुलाबी चेंडूचा वापर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅडिलेड - कसोटी क्रिकेटच्या १३८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच डे-नाइट कसोटी सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघांत शुक्रवारपासून सुरू होत आहे. प्रथमच कसोटीत लाल नव्हे तर गुलाबी रंगाचा चेंडू वापरला जाईल. इतकेच नव्हे, तर क्रिकेटमध्ये पहिल्यांदा "लंच ब्रेक'च्या आधी "टी ब्रेक' होईल.
युवा चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी आयसीसीने कसोटीतील या नव्या प्रयोगाला मान्यता दिली आहे. इतिहासातील ही २१८८ वी कसोटी आहे. पाच दिवसांचा खेळ असल्यामुळे कसोटीला रटाळ आणि वेळखाऊ म्हटले जाते. कसोटीत वेगवेगळे बदल केले नाहीत तर हा खेळ अधिक काळ टिकणार नाही, असे तज्ज्ञांना वाटल्याने डे-नाइट कसोटीचा प्रयोग होत आहे.
लंच नव्हे, तर डिनर ब्रेक
साधारणपणे कसोटीत खेळ सुरू झाल्याच्या दोन तासांनंतर ४० मिनिटांचा लंच ब्रेक होतो. २० मिनिटांचा टी ब्रेक असतो. मात्र, आजचा सामना दुपारी २ वाजता सुरू होईल. ४ वाजता २० मिनिटांचा पहिला टी ब्रेक असेल. दुसरा ब्रेक ६.२० वाजता होईल. याला लंच ब्रेकही म्हणता येणार नाही. याला डिनर ब्रेक म्हणावे लागेल. तिसरे सत्र सायंकाळी ७ वाजता सुरू होईल.
गुलाबी चेंडू कसा असेल याचे औत्सुक्य
गुलाबी चेंडू लाल चेंडूसारखाच स्विंग होईल काय ? या चेंडूचा रंग किती वेळ टिकेल? फिरकीपटूंसाठी हा चेंडू उपयुक्त ठरेल काय? फलंदाज या चेंडूने समर्थपणे खेळू शकतील काय? क्षेत्ररक्षकांना गुलाबी चेंडूने रात्री क्षेत्ररक्षण करताना, हवेतील उंच झेल पकडताना काही अडचण येईल काय? या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे या सामन्यातच मिळतील.
क्रिकेटमध्ये नवी क्रांती
डे-नाइट कसोटीचा निर्णय स्वागतार्ह आहे. खेळ टिकवण्यासाठी हे सकारात्मक पाऊल आहे. हा प्रयोग यशस्वी ठरला तर क्रिकेट विश्वात नवी क्रांती येईल.
- कपिलदेव, माजी क्रिकेटपटू.