आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्णधार म्हणून धोनीचा आज शेवटचा सामना, इंग्लंड वि. भारत अ संघात रंगणार लढत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारताचा आजपर्यंतचा सर्वोत्तम कर्णधार महेंद्रसिंग धाेनी मंगळवारी कर्णधार म्हणून आपला शेवटचा सामना खेळेल. मंगळवारी धोनी इंग्लंडविरुद्ध सराव सामन्यात भारतीय अ संघाचे नेतृत्व करणार आहे. मागच्या आठवड्यातच धोनीने टीम इंडियाच्या वनडे आणि टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले होते.   

धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर तमाम क्रिकेट जगाला धक्का बसला. धोनीच्या राजीनाम्यानंतर विराट कोहली भारताच्या तिन्ही संघांचा कर्णधार बनला आहे. मात्र, मंगळवारी धोनी भारत अ संघाचा कर्णधार म्हणून खेळेल. भारत आणि इंग्लंड यांच्यात येत्या १५ जानेवारीपासून तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेआधी पाहुणा संघ दोन सराव सामने खेळणार आहे. पहिल्या सराव लढतीत भारत अ संघाचे नेतृत्व धोनी तर दुसऱ्या सामन्यात अजिंक्य रहाणे कर्णधार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांची पदावरून हकालपट्टी झाली. यानंतर बीसीसीआयअंतर्गत देशात होणारा हा पहिलाच सामना आहे. 

धोनीसह युवराजवर लक्ष : पहिल्या सामन्यात धोनीशिवाय मर्यादित षटकांच्या खेळात पुनरागमन करणारा युवराजसिंग आणि वेगवान गोलंदाज आशिष नेहराच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. हे तिन्ही वयस्क खेळाडू इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचे सदस्य आहेत. धोनी आणि युवराज वनडे अन् टी-२० या दोन्ही संघांत सामील आहेत. आशिष नेहरा केवळ टी-२० संघाचा सदस्य आहे.   दुसरीकडे इयान मोर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडची टीम मजबूत आहे.
 
शिखर धवनचेही पुनरागमन
आक्रमक सलामीवीर शिखर धवनसुद्धा पुनरागमन करत आहे. तो मनदीपसिंगसोबत भारत अ संघाकडून डावाची सुरुवात करू शकतो. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत दुखापतीमुळे बाहेर झालेला अष्टपैलू हार्दिक पंड्यासुद्धा फिट झाला आहे.  त्याच्या मॅच फिटनेसकडे सर्वांचे लक्ष असेल. अंबाती रायडू आणि मोहित शर्मासुद्धा चांगली कामगिरी करून इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅॅम्पियन्स ट्रॉफीसाठी स्थान मिळवण्याचे प्रयत्न करतील.  यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्याकडेही लक्ष असेल.
 
युवराज, नेहराची परीक्षा  
३७ वर्षीय नेहराने या सत्रात दिल्लीकडून एकही सामना खेळलेला नाही. त्याला आपला िफटनेस सिद्ध करावा लागेल. तर दुसरीकडे युवराजने आपला अखेरचा टी-२० सामना मार्च २०१६ विश्वचषकात खेळला होता. डिसेंबर २०१३ पासून तो वनडे खेळलेला नाही. 
 
गांगुली नव्हे, धोनीच ‘दादा कर्णधार’ : शास्त्री   
मुंबई | भारताचे दोन माजी कर्णधार सौरव गांगुली आणि रवी शास्त्री यांच्यात अजूनही मतभेद कायम आहेत. अनिल कुंबळेला भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले तेव्हा गांगुली-शास्त्री यांच्यातील मतभेद समोर आले हाेते. विस्डन इंडिया मॅगझिनसोबत चर्चा करताना शास्त्री यांनी धोनीच ‘दादा कर्णधार’ असल्याचे सांगितले. या वेळी शास्त्री यांना भारताच्या महान कर्णधारांबाबत विचारले असता त्यांनी गांगुलीचे नाव घेतले नाही.
 
दोन्ही संघ असे 
भारत अ संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, मनदीपसिंग, अंबाती रायडू, युवराजसिंग, हार्दिक पंड्या, संजू सॅमसन, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, आशिष नेहरा, मोहित शर्मा, सिद्धार्थ कौल.   

इंग्लंड : इयान मोर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेयरस्ट्रो, जॅक बॉल, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर, लियाम डॉसन, अॅलेक्स हेल्स, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, डेव्हिड विली, क्रिस वोग्ज.