आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रॉ सामन्यात प्रियांक, श्रेयस, विजयशंकरची शतके, बांगलादेश-भारत अ संघाचा सराव सामना अखेर ड्रॉ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिकंदराबाद - दुबळ्या बांगलादेशविरुद्ध भारत अ संघाच्या तीन युवा फलंदाजांनी शतके ठोकून सामना गाजवला. बांगलादेशविरुद्ध भारत अ संघाचे प्रियांक पांचाळ (१०३), श्रेयस अय्यर (१००) आणि विजयशंकर (१०३*) यांनी सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शतके ठोकली. बांगलादेशने पहिल्या डावात ८ बाद २२४ धावा काढल्या होत्या. यानंतर भारत अ संघाने पहिल्या डावात ८ बाद ४६१ धावांचा डोंगर उभा केला. हा सामना ड्रॉ सुटला. बांगलादेशचा हाच संघ येत्या ९ फेब्रुवारीपासून भारताविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यात खेळेल. भारताने पहिला डाव ४६१ धावांवर घोषित केल्यानंतर बांगलादेशने दुसऱ्या डावात २ बाद ७३ धावा काढल्या होत्या. यानंतर सामना ड्रॉ झाला.   

भारत अ संघाने १ बाद ९१ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. पांचाळ ४०, तर श्रेयस अय्यर २९ धावांवर खेळत होते. दोन्ही फलंदाजांनी आपापली शतके पूर्ण केली. नंतर दोघेही रिटायर्ड हर्ट झाले. पांचाळने १४८ चेंडूंत १ षटकार, ११ चौकारांसह १०३ धावा काढल्या. श्रेयस अय्यरने ९२ चेंडूंत १०० धावा काढताना १२ चौकार आणि ४ षटकार मारले. पांचाळ आणि अय्यर यांनी दुसऱ्या विकेटसाठी १५९ धावांची दीडशतकी भागीदारी केली. अय्यर २०० तर पांचाळ २४३ च्या स्कोअरवर निवृत्त झाला. ईशांत जग्गीने २३ धावा तर नवा युवा स्टार ऋषभ पंतने ११ चेंडूंत २ चौकार, १ षटकारासह १९ धावा काढल्या. ईशान किशनने ११ तर हार्दिक पंड्याने ७ धावांचे योगदान दिले.  

भारत अ संघाने २८७ धावांत ७ विकेट गमावल्या होत्या. यानंतर विजयशंकर आणि नितीन सैनी यांनी आठव्या विकेटसाठी ११५ धावांची शतकी भागीदारी केली. विजयशंकरने ८१ चेंडूंत १४ चौकार आणि ३ षटकारांच्या साह्याने नाबाद १०३ धावा कुटल्या. सैनीने ८५ चेंडूंत ८ चौकारांसह ६६ धावा चोपल्या. 
 
दुसऱ्या डावात २ बाद ७३
बांगलादेशने दुसऱ्या डावात २ बाद ७३ धावा काढल्या. तामिम इक्बालने नाबाद ४२ आणि सौम्य सरकारने २५ धावांचे योगदान दिले. भारत अ संघाकडून कुलदीप यादवने दोन्ही गडी बाद केले. कुलदीपने २ गडी बाद केले.
बातम्या आणखी आहेत...