मुंबई- आयसीसीच्या बैठकीच्या पूर्व संध्येला बुधवारी अध्यक्ष मनोहर यांनी क्रिकेट या खेळाची फक्त मैदानावरील सचोटी कसोटीला लागली नाही तर प्रशासन व्यवस्थाही पारदर्शकतेच्या निकषांवर योग्य असल्याचे निष्पन्न होण्याची गरज निर्माण झाल्याचे सांगितले. आयसीसीच्या आज नव्याने सुरू करण्यात आलेल्या संकेतस्थळावर
आपले मनोगत, स्तंभ लेखनाच्या स्वरूपात व्यक्त करताना मनोहर यांनी आयसीसीच्या याच्याआधीच्या प्रशासकांनी खेळाच्या व सर्व सदस्यांच्या हिताविरुद्ध घेतलेल्या निर्णयांवर टीका केली आहे, तर २०१७ मध्ये त्यामध्ये वेगळे प्रशासन देऊन सर्व देशांच्या क्रिकेट व आर्थिक गोष्टींचा विकास करण्याची ग्वाही दिली आहे.
त्याचबरोबर सर्व देशांमधील आपापसातील क्रिकेट मालिकांच्या आयोजनाबाबत आयसीसीची असमर्थता व्यक्त करून, तो प्रश्न प्रत्येक देशांच्या बोर्डांच्या अखत्यारित असल्याचे मत व्यक्त केले आहे.
भारतीय क्रिकेट बोर्ड हा आयसीसीचा सर्वात महत्त्वाचा घटक असल्यामुळे गेले अनेक आठवडे, आपण सर्वोच्च न्यायालयाच्या बीसीसीआयाबाबतच्या घटना, घडामोडी बारकाईने पहात आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
बीसीसीआयचा उत्तम प्रशासन व्यवस्थेचा पाया जागतिक क्रिकेटसाठी, आयसीसीसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. जागतिक क्रिकेटमधील अनेक देशांचा विकासासाठी भारतीय क्रिकेटचा हातभार लागणे निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे बीसीसीआय प्रशासन व्यवस्थेशी आयसीसी सौंर्दयाचे संबध कायम ठेवणार असून, त्यांना आवश्यक ते साहाय्यही करणार आहे.
अायसीसीचे नवे संकेतस्थळ
आयसीसीच्या नव्या संकेतस्थळावर प्रथमच जगभरात सुरू असलेल्या सामन्यांचे धावते गुणफलक आहेत. पुरुष व महिलांच्या सामन्यांचे वर्षभराच्या कार्यक्रमाचे संपूर्ण कॅलेंडर आहे. २०१७ मधील आयसीसीच्या सर्व क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक व संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. पुरुष व महिला क्रिकेट संघांची, खेळाडूंची जागतिक रॅन्किंग उपलब्ध आहे. तर प्रत्येक देशांचे तसेच आयसीसी स्पर्धांचे ‘व्हिडिओ’देखील उपलब्ध आहेत.