आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराव सामना : भारत अ संघ पहिल्याच दिवशी मजबूत स्थितीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - हैदराबाद जिमखाना मैदानावर सुरू झालेल्या दोनदिवसीय सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी बांगलादेशविरुद्ध भारत अ संघ मजबूत स्थितीत पोहोचला. बांगलादेशने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना ६७ षटकांत ८ बाद २२४ धावांवर डाव घोषित केला.  यानंतर भारत अ संघाने अभिनव मुकुंदच्या नेतृत्वाखाली शानदार प्रदर्शन करताना १ बाद ९१ धावा काढून जोरदार प्रत्युत्तर दिले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्या वेळी प्रियांक पांचाळ ४० आणि श्रेयस अय्यर २९ धावांवर खेळत होते.   

बांगलादेशने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही. ४४ धावांपर्यंत इमारुल कायेस आणि तामिम इक्बाल पॅव्हेलियनमध्ये परतले. तामिम इक्बाल १३ आणि कायेस ४ धावा काढून बाद झाले. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या सौम्य सरकारने अर्धशतक ठोकले. त्याने ५२ धावांची खेळी केली. सरकारने ७१ चेंडूंत  १ षटकार, ९ चौकारांसह ही खेळी केली.  मात्र, भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला ५ बाद ११३ धावा अशी अडचणीत आणले. मधल्या फळीत मोमिनूल हक ६ आणि मोहमुदुल्लाह २३ धावा काढून बाद झाले.   
 
अनिकेत चौधरीच्या ४ विकेट
यानंतर कर्णधार मुशाफिकूर रहीमने शब्बीर रहेमानसोबत ७१ धावांची भागीदारी केली. दोघांनी बांगलादेशला २००  पर्यंत पोहोचवले. मुशाफिकूर रहीमने अर्धशतक ठोकले. त्याने ५८ धावांची खेळी केली. रहीमने १०६ चेंडूंत १ षटकार आणि  ८ चौकारांसह ५८ धावा काढल्या. शब्बीरने ३३ धावांचे योगदान दिले. यानंतर लिटन दासने २३ धावा काढल्या. बांगलादेशने ६७ षटकांत ८ बाद २२४ धावा काढल्यानंतर आपला पहिला डाव घोषित केला. भारत अ संघाकडून अनिकेत चौधरीने सर्वाधिक ४ गडी बाद केले. त्याच्याशिवाय चामा मिलिंद, विजय शंकर, नदीम आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एकाला बाद केले.   
 
भारताची चांगली सुरुवात
प्रत्युत्तरात भारत अ संघाकडून कर्णधार अभिनव मुकुंद आणि प्रियांक पांचाळ यांनी पहिल्या विकेटसाठी ४१ धावा काढल्या. अकराव्या षटकात अभिनव मुकुंदला १६ धावांवर सुबाशिष रॉयने बाद केले. यानंतर प्रियांक पांचाळने श्रेयस अय्यरसोबत नाबाद ५० धावांची भागीदारी करून डाव सावरला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा प्रियांकने ६२ चेंडूंत ६ चौकारांसह नाबाद ४० तर श्रेयस अय्यरने ३५ चेंडूंत १ षटकार, ४ चौकारांसह नाबाद २९ धावा काढल्या होत्या. भारत अ संघ साेमवारी बांगलादेशवर आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असेल. भारत आणि बांगलादेश यांच्यात एकमेव कसोटी सामना ९ फेब्रुवारीपासून हैदराबादेतच खेळवला जाणार आहे. बांगलादेशचा हा एकमेव सराव सामना आहे.
 
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश पहिला डाव : ८ बाद २२४. (रहीम ५८, सौम्य सरकार ५२, ४/२६ अनिकेत चौधरी).  भारत अ संघ : १ बाद ९१. (प्रियांक पांचाळ ४०*, श्रेयस अय्यर २९*)
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...