आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-दक्षिण आफ्रिकेत टी-२० चा रोमांच रंगणार! दोन्ही देशांतील मालिका २ ऑक्टोबरपासून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- द. आफ्रिकेचा क्रिकेट संघ ७२ दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्याची सुरुवात टी-२० मालिकेपासून होईल. पुढच्या वर्षी भारतात टी-२० वर्ल्डकप होईल. यामुळे या दोन्ही देशांतील या मालिकेला महत्त्व आले आहे. दोन्ही देशांतील टी-२० चे सामने धर्मशाला (२ ऑक्टोबर), कटक (५ ऑक्टोबर) आणि कोलकाता (८ ऑक्टोबर) येथे खेळवले जातील. टी-२० नंतर वनडे मालिका आणि त्यानंतर कसोटी मालिका होईल.
दोन्ही संघांच्या खेळाडूंवर नजर टाकली तर टीम इंडियाकडे महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैनासारखे अाक्रमक आणि टी-२० मध्ये तरबेज खेळाडू आहेत. दुसरीकडे आफ्रिकेकडेसुद्धा एकापेक्षा एक जबरदस्त खेळाडू आहेत. त्यांच्या भात्यात ए.न बी. डिव्हिलर्स, फॉप डुप्लेसिस, हाशीम आमला, क्विंटन डिकॉक, जे. पी. डुमिनीसारखी शस्त्रे आहेत.
टीम इंडियाच्या गोलंदाजीची मदार फिरकीपटू आर. अश्विनवर असेल. मर्यादित षटकांच्या खेळात खेळाडूला बांधून ठेवण्याचे कसब त्याच्याकडे असून तो उपयुक्त गोलंदाज आहे. त्याच्याशिवाय मोहित शर्मा, भुवनेश्वरकुमार, अमित मिश्रा यांच्यावर आपले आक्रमण अवलंबून असेल. द. आफ्रिकेचे शक्तिस्थानच त्यांची गोलंदाजी आहे, असे म्हटले तर चूक ठरणार नाही. त्यांच्याकडे जगातला सर्वाधिक वेगवान गोलंदाज डेल स्टेन आहे. मात्र, तो या मालिकेत खेळणार नाही. यामुळे त्यांच्या गोलंदाजीची मदार फिरकीपटू इम्रान ताहिर, डुमिनी, क्रिस मॉरिस यांच्यावर असेल. पहिला सामना धर्मशाला येथे होईल.

प्लेसिसपेक्षा धोनी अनुभवी
टीम इंडियाचा कर्णधार धोनीने ५० तर आफ्रिकेचा कर्णधार डुप्लेसिसने २४ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. धोनीने ५० सामन्यांत ८४९ धावा काढल्या असून डुप्लेसिसने २४ सामन्यांत ८०५ धावा जोडल्या आहेत. टी-२० मध्ये धोनीची सर्वश्रेष्ठ कामगिरी ४८ धावा असून फाफ डुप्लेसिसची सर्वश्रेष्ठ कामगिरी ११९ धावा अशी आहे.

सहा सामने जिंकून टीम इंडिया पुढे
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसोबत आतापर्यंत ८ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. यात भारताने तब्बल ६ सामने जिंकले आहेत. अवघ्या दोन सामन्यांत टीम इंडियाचा पराभव झाला. आकडे पाहिले तर टीम इंडियाची बाजू भक्कम आहे.

एबीपेक्षा कोहली अधिक यशस्वी
कोहलीने २८ टी-२० सामन्यांत ९७२ धावा काढल्या. यात ९ अर्धशतके काढली. ७८ धावा ही त्याची सर्वश्रेष्ठ कामगिरी आहे. आफ्रिकेच्या डिव्हिलर्सने ६६ सामने खेळून १०९७ धावा काढल्या आहेत. यात त्याने ५ अर्धशतके काढली.

रैना सर्वाधिक यशस्वी
मालिकेतील पहिला सामना धर्मशाला येथे होणार आहे. येथेच सुरेश रैनाने आपला सर्वश्रेष्ठ स्कोअर उभा केला आहे. त्याने दोन सामने खेळताना दोन अर्धशतकांसह १५४ धावा काढल्या. रैनाने रविवारी १०४ धावा ठाेकल्या.

भारतीय खेळाडू उजवे
आफ्रिकेच्या तुलनेत भारतीय खेळाडूंना आयपीएलमुळे टी-२० चा अनुभव आहे. धोनी, कोहली, रैना, रोहित, रहाणे या प्रत्येकाने आयपीएलमध्ये टी-२० चे सामने गाजवले आहेत. टी-२० मध्ये आफ्रिकन खेळाडूंच्या तुलनेत भारतीयांना अधिक अनुभव आहे.