आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्यनमस्कारचा फोटो शेअर केल्यानंतर मो. कैफवर टीका; नंतर क्रिकेटपटूनेही दिले सडेतोड उत्तर !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स् डेस्क- क्रिकेटपटू मोहंमद शमीनंतर आता मोहंमद कैफसुद्धा सोशल मीडियावर फॉलोअर्सच्या रागाचा बळी ठरला आहे. त्यालासुद्धा धर्माबाबत लोकांनी सल्ले दिले. घडले असे की, मोहंमद कैफने सूर्यनमस्कार करताना आपला एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला. यानंतर अनेकांनी त्याच्यावर थेट टीका सुरू केली. अनेकांनी त्याला अनाहुत सल्लेसुद्धा दिले. नंतर कैफने त्यांना जोरदार प्रत्युत्तर देऊन सर्वांची तोंडे बंद केली. 
  
मोहंमद कैफने सूर्यनमस्कार करताना चार वेगवेगळ्या पोझसह एक फोटो पोस्ट केला. या फोटोसह त्याने सूर्यनमस्कारमुळे शरीराला होणारे फायदेसुद्धा लिहिले. या फोटोसह कैफने लिहिले की, ‘शरीरासाठी सूर्यनमस्कार परिपूर्ण वर्कआऊट आहे. हे करताना कोणतीही मशीन किंवा साहित्याशिवाय शरीराचा पूर्ण व्यायाम होतो.’ यानंतर कैफवर अनेकांनी जोरदार टीका सुरू करताना धार्मिक ज्ञान देण्यास सुरुवात केली. एका युजरने लिहिले की, ‘सूर्यनमस्कार धर्माच्या विरुद्ध आहे. तुम्ही असे वादग्रस्त फोटो का पोस्ट करत आहात.’ आणखी एका युजरने म्हटले की,‘आपल्या धर्मामध्ये सूर्यनमस्कारला पूर्णपणे विरोध आहे.’
   
यानंतर कैफने ट्रोलर्सला उत्तर दिले. कैफने आणखी एक फोटो पोस्ट केला आणि लिहिले की, ‘या चार मूव्हज करतानासुद्धा अल्लाह माझ्या मनात असतो. मला एक गोष्ट कळत नाही की, सूर्यनमस्कार असो की जिम - व्यायामाचे कोणत्याही धर्माशी काय देणेघेणे? व्यायाम हे सर्वांसाठीच एकसारखे फायद्याचे आहेत.’ यानंतर अनेकांनी कैफचे समर्थन करताना त्याच्या टीकाकारांना उत्तर दिले. 
  
काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहंमद शमीलासुद्धा अशा टीकेचा सामना करावा लागला होता. शमीने त्याची पत्नी हसीन जहाँसोबत एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोमध्ये त्याची पत्नी स्लिव्हलेस ड्रेसमध्ये होती. यानंतर अनेकांनी शमीवर टीका केली, तर जावेद अख्तर, फरहान अख्तर, मोहंमद कैफ आदींनी शमीचे समर्थन 
केले होते.

अन् कैफ म्हणाला, सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग !
या सर्व प्रकरणानंतर एका चाहत्याने मोहंमद कैफला िट्वट करून समर्थन देण्याचे प्रयत्न केले. त्या चाहत्याने लिहिले की, ‘कैफ, याकडे दुर्लक्ष करा. कुछ तो लोग कहेंगे..' यावर कैफनेही जबरदस्त उत्तर दिले. कैफ म्हणाला, ‘सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग.' म्हणजे लोक काय म्हणतील याचा विचार करून आपण आपले काम करणे सोडू शकत नाही. 

एका चाहत्याने कैफच्या फिटनेस आणि व्यायामाकडून प्रेरित होऊन पुन्हा व्यायाम सुरू केले. त्या चाहत्याने म्हटले की, कैफला बघून मी नव्या वर्षात पुन्हा व्यायामाला सुरुवात केली आहे.
बातम्या आणखी आहेत...