आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्थिवचे शतक हुकले, गुजरातच्या 6 बाद 291 धावा, पार्थिवची 90 धावांची झुंजार खेळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - येथे सुरू असलेल्या रणजी करंडक फायनलच्या दुसऱ्या दिवशी पार्थिव पटेलचे (९०) शतक हुकले असले तरीही त्याच्या खेळीमुळे गुजरातने मुंबईविरुद्ध ६३ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्या वेळी गुजरातने पहिल्या डावात ६ बाद २९१ धावा काढल्या होत्या. दिवसाचा खेळ संपला त्या वेळी चिराग गांधी १७ आणि रुष कलारिया १६ धावांवर खेळत होते.   

सामन्याचा दुसरा दिवस गुजरातच्या नावे राहिला. सकाळच्या सत्रात गुजरातने दोन विकेट गमावल्या. गुजरातचे सलामीवीर मोठी खेळी करू शकले नाहीत. सलामीवीर गोहिल ४ धावा काढून शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर बाद झाला. दुसरा सलामीवीर प्रियांक पांचाळला ६ धावांवर अभिषेक नायरने विकेटकीपर तारेकरवी झेलबाद केले. गोहिलने ३४ चेंडूंत ४ धावा, तर पांचाळने ५१ चेंडूंत ६ धावा काढल्या. गुजरातने ३७ धावांत २ विकेट गमावल्या होत्या. यानंतर मेराई आणि कर्णधार पार्थिव पटेलने डाव सावरला. मेराईने १०० चेंडूंत ७ चौकारांसह ४५ धावा काढल्या. त्याने पार्थिवसोबत तिसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली. जेवणाच्या ब्रेकपर्यंत गुजरातने २ बाद ७३ धावा काढल्या होत्या. अर्धशतकाकडे वाटचाल करणाऱ्या मेराईला नायरने तारेकरवी झेलबाद केले.
 
पार्थिव-मनप्रीतची भागीदारी 
गुजरातची टीम ३ बाद १०६ धावा अशी संकटात सापडली होती. यानंतर पार्थिव पटेल आणि मनप्रीत जुनेजा यांनी चौथ्या विकेटसाठी १२० धावांची शतकी भागीदारी करून सामना फिरवला. पार्थिवने १४६  चेंडूंत १२ चौकारांच्या साह्याने ९० धावा ठोकल्या. थोड्या वेळाने मनप्रीत जुनेजासुद्धा बाद झाला. त्याने ७७ धावांचे योगदान दिले. 
 
तिसऱ्या दिवशी काय?  
गुजरातकडे आता ६३ धावांची आघाडी आहे. त्यांच्या हाती ४ विकेट शिल्लक आहेत. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी गुजरातच्या उर्वरित  चार विकेट लवकर बाद करून गुजरातला मोठी आघाडी घेण्यापासून रोखण्याचे प्रयत्न मुंबई करेल. दुसरीकडे गुजरातचे लक्ष्य ४०० धावांचा  टप्पा गाठून मोठी आघाडी घेण्याचे असेल.