इंदूर - इंदुरात सुरू असलेल्या रणजी करंडकाच्या फायनलमध्ये तिसऱ्या दिवशी मंुबईच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी करून सामना रोमांचक वळणावर पोहोचवला. मुंबईकडून तिसऱ्या दिवशी युवा फलंदाज श्रेयस अय्यरने जबरदस्त खेळी करताना ८२ धावा ठोकून अर्धशतक झळकावले. गुजरातने पहिल्या डावात ३२८ धावा काढून १०० धावांची आघाडी घेतली होती. यानंतर मुंबईने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवशी ३ बाद २०८ धावा काढल्या. आता सामन्याच्या चौथ्या दिवशी मुंबईचे फलंदाज किती धावा काढतात आणि गुजरातला विजयासाठी किती धावांचे लक्ष्य देतात, यावर सामन्याचा निकाल अवलंबून असेल.
सकाळी गुजराने पहिल्या डावात ६ बाद २९१ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. मात्र, मुंबईने उर्वरित ४ विकेट लवकर घेऊन गुजरातला ३२८ धावांवर रोखले. मुंबईकडून शार्दूल ठाकूरने सर्वाधिक ४ गडी बाद केले. याशिवाय बलविंदर सिंग संधू ज्यु. आणि अभिषेक नायर यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. गुजरातकडून पार्थिव पटेलने सर्वाधिक ९० धावा, तर मनप्रीत जुनेजाने ७७ धावांचे योगदान दिले.
पहिल्या डावात १०० धावांनी मागे पडलेल्या मुंबईने दुसऱ्या डावात चांगली सुरुवात केली. ५४ च्या स्कोअरवर अखिल हेरवाडकर आणि नंतर ६६ च्या स्कोअरवर पृथ्वी शॉ बाद झाले. पृथ्वीने ३५ चेंडूंत ८ चौकारांसह वेगवान ४४ धावा काढल्या. यानंतर श्रेयस अय्यरने तिसऱ्या विकेटसाठी सूर्यकुमार यादवसोबत १२७ धावांची भागीदारी करून डाव सावरला. श्रेयस अय्यरने १३७ चेंडूंचा सामना करताना २ षटकार आणि ९ चौकारांसह ८२ धावा काढल्या. दिवसाचा खेळ संपायला थोडा वेळ शिल्लक असताना श्रेयस बाद झाला. गुजरातकडून तिन्ही विकेट चिंतन गाजाने घेतल्या. दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी मुंबईकडून सूर्यकुमार यादव ४५ आणि आदित्य तारे १३ धावांवर खेळत होते.
संक्षिप्त धावफलक : मुंबई : २२८ आणि ३ बाद २०८ धावा. (श्रेयस अय्यर ८२, ३/५४ चिंतन गाजा). गुजरात पहिला डाव : ३२८.