आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणजी ट्रॉफी : चिराग जानीचे नाबाद शतक , जयदेव शहाचे द्विशतक; सौराष्ट्राच्या ६५७ धावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंध्र प्रदेश - कर्णधार जयदेव शहाचे द्विशतक आणि चिराग जानीच्या नाबाद शतकाच्या बळावर सौराष्ट्राने महाराष्ट्राविरुद्ध रणजी ट्रॉफीत १७०.५ षटकांत ८ बाद ६५७ धावांचा डोंगर उभारत डाव घोषित केला. महाराष्ट्राने पहिल्या डावात दुसऱ्या दिवसअखेर ६ षटकांत बिनबाद १८ धावा केल्या.

कालच्या ३ बाद २८५ धावांच्या पुढे खेळताना सौराष्ट्राच्या फलंदाजांनी धुवाधार खेळी केली. अर्धशतकी खेळी करणाऱ्या अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराचे शतक अवघ्या सात धावांनी हुकले. त्याने २४६ चेंडूंचा सामना करताना ८ चौकार आणि १ षटकार खेचत ९३ धावा काढल्या. त्याला मोहसीन सय्यदने यष्टिरक्षक विशांत मोरेकरवी झेलबाद करत अडथळा दूर केला. दुसऱ्या बाजूने कर्णधार जयदेव शहाने तडाखेबंद खेळी सुरू ठेवली. पुजारा व शहा जोडीने ८६ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर आलेल्या ए.व्ही. वासावादाने १२८ चेंडूंत ४६ धावा जोडल्या. शहा आणि वासावादा जोडीने १२४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. सातव्या क्रमांकावर आलेल्या चिराग जानीने वनडे स्टाइलने फटकेबाजी करत नाबाद शतकी खेळी केली. त्याने ९६ चेंडूंत १० चौकार आणि २ षटकार खेचत नाबाद १०० धावा ठोकल्या. महाराष्ट्राच्या मोहसीन सय्यदने ९० धावा देत ४ गडी बाद केले. श्रीकांत मुंढे, राहुल त्रिपाठी व अक्षय दरेकरने प्रत्येकी एक गडी टिपले. दिवस अखेर महाराष्ट्राकडून पहिल्या डावात स्वप्निल गुगळे नाबाद १० तर, नाशिकचा मुर्तुझा ट्रंकवाला नाबाद ७ धावांवर खेळत आहेत.

जयदेव शहा चमकला
सौराष्ट्राच्या कर्णधार जयदेव शहाने कर्णधाराला साजेशी खेळी करत द्विशतक ठोकले. त्याने २७० चेंडूंचा सामना करताना २५ चौकार आणि ५ षटकार खेचत २१७ धावा काढल्या. युवा वेगवान गोलंदाज श्रीकांत मुंढेने चिराग खुराणाकरवी त्याला झेलबाद केले. शहा व चिराग जानी या जोडीने सहाव्या विकेटसाठी १७४ धावांची भागीदारी रचली.

संक्षिप्त धावफलक
सौराष्ट्र पहिला डावात ८ बाद ६५७ धावांवर डाव घोषित. शेल्डन जॅक्सन १०५, जयदेश शहा २१७, चिराग शहा नाबाद १००, मोहसीन सय्यद ९०/४, महाराष्ट्र पहिला डाव बिनबाद १८ धावा, स्वप्निल गुगळे नाबाद १०, मुर्तुझा ट्रंकवाला नाबाद ७ धावा.
बातम्या आणखी आहेत...