आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॉस टेलरमुळे न्यूझीलंडची मालिकेत बरोबरी, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध न्यूझीलंडचा 6 धावांनी निसटता विजय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ख्राइस्टचर्च -रॉस टेलरच्या (नाबाद १०२) शतकानंतर गोलंदाजांच्या शानदार प्रदर्शनाच्या बळावर न्यूझीलंडने मालिकेतील दुसऱ्या वनडेत द. आफ्रिकेला ६ धावांनी पराभूत केले. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत २८९ धावा काढून द. आफ्रिकेपुढे विजयासाठी २९० धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात द. आफ्रिकन संघाला ९ बाद २८३ धावाच काढता आल्या. न्यूझीलंडने निसटता ६ धावांनी विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने मालिकेत १-१ ने बरोबरी केली आहे.  
 
धावांचा पाठलाग करताना द. आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर हाशिम आमला अवघ्या १० धावा काढून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेला फॉप डुप्लेसिसही मोठी खेळी करू  शकला नाही. डुप्लेसिसने ११ धावांचे योगदान दिले. मधल्या फळीत जे. पी. डुमिनी ३४ धावा काढून चालता झाला. त्याने ४४ चेंडूंत ३ चौकारांसह ही खेळी केली.
 
 एका टोकाहून एकेक गडी बाद होत असताना दुसऱ्या टोकाने सलामीवीर क्विंटन डीकॉकने अर्धशतक ठोकले. त्याने ६५ चेंडूंत ६ चौकारांसह ५७ धावा काढल्या. कर्णधार ए. बी. डिव्हिलर्सने ४५ तर डेव्हिड मिलरने २८ धावांचे योगदान दिले. अखेरीस डी. प्रिटोरियसने २७ चेंडूंत ५० धावा ठोकून विजयाचे प्रयत्न केले. 
 
मात्र, त्याचे प्रयत्न अपुरे ठरले. प्रिटोरियसने २७ चेंडूंत २ षटकार आणि ४ चौकारांसह ५० धावा काढल्या. प्रिटोरियसने सामन्यात रंगत आणली हाेती. मात्र, तो अपयशी ठरला.न्यूझीलंडकडून गोलंदाजीत टी. बोल्टने ६३ धावांत ३ तर मिशेल सँटनरने ४६ धावांत २ गडी बाद केले. टीम साऊथी, ग्रँडहोम यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.  
 
रॉस टेलरचे शतक
न्यूझीलंडकडून रॉस टेलरने शतक ठोकून संघाला २८९ चा स्कोअर गाठून दिला. न्यूझीलंडकडून केन विल्यम्सनने ६९, रॉस टेलरने नाबाद १०२ आणि जेम्स निशामने नाबाद ७१ धावा ठोकल्या. टेलरने ११० चेंडूंत ८ चौकारांसह नाबाद १०२ धावा काढल्या. निशामने ५७ चेंडूंत ६ चौकारांसह ७१ धावा काढल्या.
बातम्या आणखी आहेत...