आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीआयच्या तिजोरीला सर्वोच्च न्यायालयाचे कुलूप, आर्थिक व्यवहारांना बंदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - न्या. लोढा समितीने सुचवलेल्या सुधारणांविषयक शिफारशी लागू करण्याबाबत राज्य क्रिकेट संघटना जोपर्यंत निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत बीसीसीआयने त्यांना कोणत्याही प्रकारचा निधी देऊ नये, असा स्पष्ट आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने देशाची सर्वोच्च क्रिकेट संघटना असलेल्या भारतीय क्रिकेट िनयामक मंडळाला (बीसीसीआय) दिला.
या आदेशाद्वारे बीसीसीआय आणि त्यांच्या संलग्न राज्य संघटना यांच्यातील सर्व आर्थिक व्यवहार गोठवण्यात आले आहेत. क्रिकेट सामन्यांच्या आयोजनासाठीही आता निधी देता येणार नाही. बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर व सचिव अजय शिर्के यांना ३ डिसेंबरपर्यंत शपथपत्राद्वारे शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी किती अवधी लागणार आहे याची हमी देण्याचे आदेशही दिले आहेत.
सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड व न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या न्यायपीठाने हे आदेश देताना बीसीसीआयच्या हिशेबांची छाननी करण्याकरिता स्वतंत्र हिशेब तपासनीस नेमण्याचे लोढा समितीला सुचवले आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनीही बीसीसीआयमधील आर्थिक अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र हिशेब तपासनीस नेमून महागड्या करारांची छाननी करण्यास सांगितले आहे. पुढील सुनावणी ५ डिसेंबरला होत आहे. यापूर्वी बीसीसीआयने दाखल केलेली पुनर्विचार याचिका न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली होती. लोढा समितीने केलेल्या सर्व शिफारशी योग्य असल्याचे निरीक्षण न्यायपीठाने नोंदवले होते.

एक राज्य एक मत
लोढा समितीने बीसीसीआयसाठी एक राज्य एक मत, अधिकाऱ्यांसाठी वयाची मर्यादा तसेच कार्यकाळाला मर्यादा, मंत्र्यांना मंडळापासून दूर ठेवण्यात यावे, अशा महत्त्वपूर्ण शिफारशी केलेल्या आहेत. या शिफारशी लागू करण्यास बीसीसीआयने नकार दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने मात्र कोणत्याही परिस्थितीत या शिफारशी लागू करण्यात याव्यात, असे आदेश दिले होते.

बीसीसीआयला खलनायकासारखे चित्रित केले...
बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि क्रिकेट मॅनेजर रत्नाकर शेट्टी यांच्या बचावार्थ बीसीसीआयचे वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात बाजू मांडली. सध्या बीसीसीआयची प्रतिमा खलनायकासारखी चित्रित करण्यात येत असल्याचे सांगून जणू काही बीसीसीआयमुळेच सर्व वाईट गोष्टी घडत आहेत, असे भासवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...