आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंका दौराः कोहली ब्रिगेडची कसोटी, आजपासून टीम इंडियाचा अध्यक्षीय संघासोबत सराव सामना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबो - कोहली ब्रिगेड गुरुवारपासून श्रीलंकेच्या मैदानावर अॅक्शनमध्ये दिसेल. श्रीलंकेच्या दौऱ्यात गुरुवारपासून टीम इंडियाला श्रीलंका अध्यक्षीय संघासोबत तीनदिवसीय सराव सामना खेळायचा आहे. १२ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या कसोटी मालिकेपूर्वी हा सराव सामना भारतासाठी महत्त्वाचा ठरेल. कोहली पूर्ण मालिकेसाठी कर्णधार असून कोलंबोत दाखल झाल्यानंतर काही तासांतच त्याने आपल्या सहकारी खेळाडूंसह सराव सुरू केला.
कसोटी मालिकेपूर्वी भारताला श्रीलंकेच्या भूमीवर तेथील वातावरणाशी, खेळपट्ट्यांशी एकरूप होण्याची एकमेव संधी या सराव सामन्याद्वारे मिळेल. यामुळे हा सामना कोहली ब्रिगेडसाठी अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचा आहे. भारतीय संघ खूप सराव करून श्रीलंकेत पोहोचलेला नाही. शिवाय संघातील बरेच सीनियर खेळाडू एक महिन्याच्या विश्रांतीनंतर भारतीय संघात पुनरागमन करीत आहेत. इतकेच नव्हे तर टीम इंडियाच्या १५ खेळाडूंपैकी तब्बल १० खेळाडू श्रीलंकेत पहिल्यांदा कसोटी मालिका खेळणार आहेत. यामुळे सराव सामना महत्त्वाचा ठरू शकतो. असे असले तरीही हवामान खात्याच्या अंदाजानुसार सराव सामन्यात वरुणराजा अडथळा आणू शकतो.

पावसाची शक्यता
या सराव सामन्यापूर्वीच हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने टीम इंडिया चिंतित आहे. पावसाचा अंदाज असला तरीही टीम इंडियाने सरावात कसूर केली नाही. टीम इंडियाने सोमवार आणि मंगळवारी नॅशनल इनडोअर स्टेडियममध्ये सराव केला. सराव सामन्यांतील या खेळाडूंच्या प्रदर्शनावरून कसोटीसाठी अंितम संघ िनवड करणे सोपे होईल. लोकेश राहुल, धवन आणि मुरली विजय या तिघांच्या उपस्थितीमुळे भारताच्या सलामीची फळी निश्चित झालेली नाही. रोहित तिसऱ्या क्रमांकावर खेळणे निश्चित आहे. यानंतर कोहली, रहाणे खेळतील.
कोहलीवर दुहेरी जबाबदारी
कोहलीसाठी या दौऱ्यात दुहेरी जबाबदारी असेल. एक तर युवा खेळाडूंना सोबत घेऊन चालण्याचे आव्हान तसेच सकारात्मक निकाल देण्याचे आव्हान कोहलीसमोर असेल. कोहलीने अखेरचा कसोटी सामना बांगलादेशविरुद्ध फातुल्ला येथे खेळला होता. त्या सामन्यात तो केवळ १४ धावा काढू शकला. मात्र, या सामन्यात मुरली विजयने १५०, तर शिखर धवनने १७३ धावांची खेळी केली होती. शिवाय रहाणेने ९८ धावा चोपल्या होत्या. आता सराव सामन्यात या खेळाडूंकडून अशाच प्रभावी कामगिरीची आशा व्यक्त केली जात आहे.

२४- सामने खेळले विराट कोहलीने
विराट कोहलीने लंकेच्या भूमीवर १८ वनडे आणि ६ टी-२० सामने खेळले आहेत. १८ वनडेत त्याने २ शतकांसह ३५.५६ च्या सरासरीने ५६९ धावा काढल्या, तर ६ टी-२० सामन्यांत एकूण २५३ धावा काढल्या.
२८- सामने रोहित शर्माने खेळले
रोहितने श्रीलंकेत २१ वनडे, ७ टी-२० सामने खेळले. यात १५.९३ च्या सरासरीने केवळ २५५ धावा काढल्या. टी-२० मध्ये त्याने ७ सामन्यांत ८६ धावा केल्या.
दोन्ही संभाव्य संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, लोकेश राहुल, राेहित शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान साहा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, हरभजनसिंग, ईशांत शर्मा, वरुण अॅरोन, अमित मिश्रा, उमेश यादव.

श्रीलंका अध्यक्षीय संघ : लाहिरू थिरिमाने (कर्णधार), धनंजय डिसिल्वा, कुशल सिल्वा, उपुल थरंगा, एम. सिरिवर्धना, कुशल परेरा, सेहन जयसूर्या, निसाला थिराका, कसून रजिथा, विश्वा फर्नांडो, जेफ्री वेंडरसे, लाहिरू गमागे, गुणातिलाके.