आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रेयस अय्यरचे नाबाद द्विशतक; सामना ड्रॉ, सराव सामन्यात अाॅस्ट्रेलियाविरुद्ध भारत अ संघाच्या 403 धावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - युवा फलंदाज श्रेयस अय्यरने शानदार प्रदर्शन करताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीनदिवसीय सराव सामन्यात भारत अ संघाकडून नाबाद २०२ धावांची खेळी केली.  हा सामना ड्रॉ झाला. २२ वर्षीय श्रेयस अय्यरचा हा प्रथम श्रेणीतील सर्वोच्च स्कोअर ठरला. त्याने ३०६ मिनिटे खेळपट्टीवर राहत २१० चेंडूंचा सामना  करताना २७ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद २०२ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ७ बाद ४६९ धावा काढल्या होत्या. दिवसाचा खेळ संपला त्या वेळी दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने ४ बाद ११० धावा काढल्या होत्या.  
 
मुंबईचा श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला त्या वेळी भारत अ संघ १९ धावांत १ विकेट असा संकटात होता.  यानंतर अय्यरने नाबाद २०२ धावा काढल्या. तेव्हा भारत अ संघाच्या ४०३ धावा झाल्या होत्या. कृष्णप्पा गोथमने ६८ चेंडूंत १० चौकार, ४ षटकारांसह ७४ धावा ठोकल्या. अय्यर आणि गोथमने सातव्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी केली.   
 
भारत अ संघाने तिसऱ्या दिवशी ४ बाद १७६ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. पंत २१ धावा काढून बाद झाला. गोथम ३७२ च्या स्कोअरवर बाद झाला. शाहबाज नदीम (०), अशोक डिंडा (२) आणि नवदीप सैनी (४) दुहेरी धावसंख्यासुद्धा गाठू शकले नाहीत. श्रेयसच्या  द्विशतकामुळे भारत अ संघाने चारशेचा टप्पा ओलांडला. 
  
अॉस्ट्रेलियाकडून नॅथन लॉयनने २८.५ षटकांत १६२ धावांत ४ गडी बाद केले. डावखुरा फिरकीपटू स्टीव्ह ओ किफने २४ षटकांत १०१ धावांत ३ गडी बाद केले. जॅक्सन बर्डने २० षटकांत ६० धावांत २, तर मिशेल मार्शने १३ षटकांत ४५ धावांत एकाला बाद केले.
 
दुसऱ्या डावात घसरण
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ३६ षटकांत ४ बाद ११० धावा काढल्या. अशोक डिंडाने डेव्हिड वॉर्नरला बाद केले.  वॉर्नरने ४९ चेंडूंत ६ चौकारांसह ३५ धावा काढल्या. भारत अ संघाकडून हार्दिक पंड्याने मॅट रेनशॉला (१०) त्रिफळाचीत केले. नवदीप सैनीने ग्लेन मॅक्सवेलचा (१) अडथळा दूर केला.
बातम्या आणखी आहेत...