आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅले कसोटी: रंगना हेराथचा विश्वविक्रम; लंकेचा बांगलादेशला दणका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅले - गॅले कसोटीत श्रीलंकेने बांगलादेशला २५९ धावांनी हरवून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. विजयासाठी अावश्यक असलेल्या ४५७ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची टीम दुसऱ्या डावात अवघ्या १९७ धावांत ढेर झाली. श्रीलंकेकडून कर्णधार रंगना हेराथने दुसऱ्या डावात ५९ धावांत ६ गडी बाद केले. या सामन्यात रंगना हेराथने विश्वविक्रमही केला. तो जगात सर्वाधिक विकेट घेणारा डावखुरा फिरकीपटू ठरला आहे.  
बांगलादेशने कालच्या बिनबाद ६७ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. ५३ धावा काढून अर्धशतक ठोकणारा सौम्य सरकार पहिल्या तासातच बाद झाला. सरकारला गुनारत्नेने त्रिफळाचीत केले. यानंतर बांगलादेशच्या विकेट एकापाठोपाठ एक पडत गेल्या. यानंतर तिसरा परेराने मोमिनूल हकला ५ धावांच्या स्कोअरवर पायचीत करून पॅव्हेलियनमध्ये परतवले. थोड्या वेळाने गुणरत्नेने तामिम इक्बालची विकेट घेतली. तामिमने १९ धावांचे योगदान दिले. त्या वेळी बांगलादेशच्या ३ बाद ८३ धावा झाल्या होत्या.   

बांगलादेशला तीन धक्के दिल्यानंतर यजमान संघाच्या गोलंदाजीची जबाबदारी कर्णधार रंगना हेराथने सांभाळली. त्याने आपल्या फिरकीची जादू दाखवताना विरोधी फलंदाजांना त्रस्त करून सोडले. हेराथने सर्वात आधी सकिब-अल-हसनला (८) करुणारत्नेकरवी झेलबाद केले. यानंतर याच षटकात मोहमुदुल्लाहला शून्यावर पायचीत करून बांगलादेशचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतवला. त्या वेळी बांगलादेशचा स्कोअर  ५ बाद १०४ धावा असा झाला होता. यानंतर लिंटन दास आणि मुशाफिकूर रहीम यांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. हेराथने लिंटन दासला (३५) आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवून ही भागीदारी मोडली. या विकेटसह हेराथने विश्वविक्रम केला. तो कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा  डावखुरा फिरकीपटू ठरला आहे. याआधीचा विक्रम न्यूझीलंडच्या डॅनियल व्हिट्टोरीच्या नावे होता. व्हिट्टोरीने ३६२ बळी घेतले. हेराथने हा आकडा ओलांडला.   
 
मुशाफिकूर रहीमला (३४) संदाकनने डिकवेलाकरवी झेलबाद केले. यानंतर २८ धावा काढणाऱ्या मेहंदी हसनला हेराथने कुमाराकरवी झेलबाद केले. तळाचे फलंदाज हेराथसमोर टिकू शकले नाहीत. शनिवारी बांगलादेशच्या फलंदाजांनी अवघ्या १३४ धावा काढता आल्या आणि त्यांचा डाव १९७ धावांत आटोपला. श्रीलंकेने ही कसोटी २५९ धावांनी जिंकली. श्रीलंकेने पहिल्या डावात ४९४ धावा तर दुसऱ्या डावात ६ बाद २७४ धावा काढल्या. बांगलादेशने पहिल्या डावात केवळ ३१२ धावा काढल्या होत्या.  लंकेकडून हेराथने ६ गडी बाद केले. पहिल्या डावात शानदार शतक ठोकणारा लंकेचा फलंदाज कुशन मेंडिसला “मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला. 
 
हेराथ यशस्वी डावखुरा फिरकीपटू
श्रीलंकेचा रंगना हेराथ सर्वाधिक यशस्वी डावखुरा फिरकीपटू ठरला आहे. त्याने बांगलादेशच्या लिंटन दासला बाद करून न्यूझीलंडच्या डॅनियल व्हिट्टोरीचा ३६२ कसोटी बळींचा विक्रम मागे टाकला. क्रिकेटच्या इतिहासात डावखुरा गोलंदाज म्हणून हेराथ आणि वसीम अक्रमनंतर दुसरा यशस्वी गोलंदाज आहे. तर डावखुरा फिरकीपटू म्हणून तो आता सर्वात पुढे आहे. हेराथने १९९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते.
 
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : ४९४ आणि ६ बाद २७४ (डाव घोषित). बांगलादेश ३१२ आणि १९७. (सौम्य सरकार ५३, ३४ मुशाफिकूर, ६/५९ रंगना हेराथ).
बातम्या आणखी आहेत...