आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली अाता 100 कोटींच्या क्लबमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नवी दिल्ली  - टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आता १०० कोटींच्या विशेष क्लबमध्ये पोहोचला आहे. विराटने क्रीडा साहित्य बनवणाऱ्या एका मोठ्या कंपनीसोबत तब्बल ११० कोटी रुपयांचा करार केला आहे. हा करार ८ वर्षांसाठी केला असून त्याला ठरलेल्या रकमेसह कंपनीच्या व्यवसाय वृद्धीनुसार रॉयल्टीही मिळेल. या कंपनीच्या ब्रँडचा ग्लोबल अॅम्बेसेडर म्हणून कोहली आता जमैकाचा युसैन बोल्ट, आसाफा पॉवेल, फुटबॉलपटू थिएरे हेन्री आणि ऑलिव्हर गिरॉड यांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.  
 
सचिन, धोनीसह आता कोहली  : भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनीसुद्धा बऱ्याच वर्षांचा करार करून १०० कोटींच्या क्लबमध्ये आधीच सामील आहेत. त्यांनी स्पोर्ट््स आणि टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीसोबत करार केला होता. क्रिकेटमधील २४ वर्षांच्या दीर्घ करिअरमध्ये सचिनने ५० ब्रँडसाठी जाहिराती केल्या आणि ५०० कोटींची डील केली होती. सचिनने १९९५ मध्ये वर्ल्डटेलसोबत ३० कोटींचा करार केला. 
 
दरम्यान २००१ मध्ये हा करार दुप्पट झाला. २००६ मध्ये सचिनने जाहिरात कंपनी साची अँड साची आयकॉनिक्ससोबत तीन वर्षांसाठी १७५ कोटींचा करार केला होता. भारतीय संघाच्या महेंद्रसिंग धोनीने जाहिरातीतून जवळपास १८० कोटींची कमाई केली. त्याने २० ब्रँडच्या जाहिराती केल्या. २०१३ मध्ये कोहलीने क्रीडा साहित्य बनवणाऱ्या एका कंपनीसोबत तीन वर्षांसाठी १० कोटींचा करार केला. हा करार डिसेंबर २०१६ मध्ये संपला.
 
अाता दरवर्षी १२ ते १४ कोटी रुपये
ठरलेल्या रकमेशिवाय कोहलीला ८ वर्षांत कंपनीच्या व्यवसाय वाढीनंतर रॉयल्टीही मिळेल.  कोहली या मूळच्या जर्मनीच्या कंपनीसोबत स्पोर्ट्स लाइफस्टाइल प्रॉडक्टमध्ये सिग्नेचर लाइनही लाँच करणार आहे. याचा विशेष लोगो आणि ब्रँडची ओळखही असेल. या करारांतर्गत कोहलीला वर्षाला १२ ते १४ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. या कराराबाबत कोहली म्हणाला, “इतक्या मोठ्या कंपनीसोबत काम करणे ही आनंदाची बाब आहे.  या कंपनीने फक्त बोल्ट नव्हे तर पेले, मॅरेडोना, हेन्रीसोबत काम केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...