आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांगारुंना लोळवले...भारतीय महिला संघ फायनलमध्ये, हरमनप्रीत काैरची चौफेर धुलाई, नाबाद 171 धावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डर्बी- भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 36 धावांनी पराभूत करून विश्वचषकाच्या फायनलमध्ये मजल मारली आहे. भारतीय संघाची युवा फलंदाज हरमनप्रीत काैरने गुरुवारी महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात झंझावाती खेळी करून भारताला फायनलचे तिकीट मिळवून दिले. तिने सहा वेळच्या विश्वविजेत्या अाॅस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनलमध्ये नाबाद 171 धावांची खेळी केली. या दीड शतकाच्या बळावर भारतीय महिलांनी प्रथम फलंदाजी करताना अाॅस्ट्रेलियासमाेर विजयासाठी 282 धावांचे खडतर लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात अाॅस्ट्रेलियन महिला संघ 40.1 षटकांत सर्वबाद 245 धावात ऑलआऊट झाला. 

पावसाच्या व्यत्ययामुळे दुसरा उपांत्य सामना प्रत्येकी ४२ षटकांचा ठेवण्यात अाला. दरम्यान, प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय महिलांची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर स्मृती मानधना (६) अाणि पूनम राऊत (१४) झटपट बाद झाल्या. त्यांना सामन्यात लय गवसली नाही. त्यामुळे त्या अपयशी ठरल्या.  

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी अालेल्या हरमनप्रीत काैरने संघाचा डाव सावरला. यादरम्यान तिला कर्णधार मितालीची महत्त्वाची साथ मिळाली. या दाेघींनी तिसऱ्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी रचली अाणि संघाच्या धावसंख्येला गती दिली. दरम्यान, कर्णधार मितालीने सामन्यात ६१ चेंडूंत ३६ धावांची खेळी करून तंबू गाठला.  

भारताकडून फाॅर्मात असलेल्या हरमनप्रीत काैरने मैदानावरची अापली झंझावाती खेळी शेवटपर्यंत कायम ठेवली. या वेळी तिला दीप्तीने माेलाची साथ दिली. त्यामुळे या दाेघांना चाैथ्या विकेटसाठी १३७ धावांची माेठी भागीदारी रचता अाली. त्यामुळे टीमच्या धावसंख्येला गती मिळाली. दीप्तीने ३५ चेंडूंत २५ धावांचे याेगदान दिले. त्यानंतर वेदा कृष्णमूर्तीनेही शानदार साथ दिली.

१९८३ च्या वर्ल्डकपमधील कपिलच्या खेळीला उजाळा 
महिला फलंदाज हरमनप्रीतने गुरुवारी अापल्या  खेळीतून  १९८३ मध्ये पुरुषांच्या वर्ल्डकपमधील कपिलदेवच्या झंझावाताला उजाळा दिला.  त्या वेळी करा वा मरा असलेल्या सामन्यात कपिलदेवने १३८ चेंडूंत १६ चाैकार अाणि सहा षटकारांसह नाबाद १७५ धावा काढल्या हाेत्या. अाता हरमनप्रीतने ११५ चेंडूंत २० चाैकार अाणि ७ षटकारांच्या अाधारे नाबाद १७१ धावांची खेळी केली.

झुलनने टाकले इडुलजींना मागे
भारताची अनुभवी गाेलंदाज झुलन गाेस्वामी अाता वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी भारतीय महिला ठरली.तिच्या नावे ३२ विकेट झाल्या. तिने  भारताच्या माजी गाेलंदाज डायना इडलुजी (३१ बळी) यांना मागे टाकले. इडुलजी यांच्या नावे ३१ विकेटची नाेंद  अाहे.

शेवटच्या दहा षटकांत १२९ धावा 
हरमनप्रीत काैरने अापली तुफानी फटकेबाजी कायम ठेवताना शेवटच्या दहा षटकांत अाॅस्ट्रेलियन गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. त्यामुळे या षटकांत भारताला १२९ धावा काढता अाल्या. यामध्ये शेवटच्या सहा षटकांतील ६६ धावांचा समावेश अाहे.

सर्वाेच्च स्काेअरर 
हरमनप्रीतने वर्ल्डकपच्या नाॅकअाऊट सामन्यात वैयक्तिक सर्वाेच्च स्काेअररची नाेंद केली. तिने ११५ चेंडंूत  २० चाैकार व ७ षटकारांसह नाबाद १७१ धावांची खेळी केली. याशिवाय महिला वर्ल्डकपमध्ये भारतीय फलंदाजाची ही सर्वाधिक धावांची खेळी ठरली.   
 
वर्ल्डकपमधील चाैथी माेठी खेळी 
हरमनप्रीतने महिलांच्या वर्ल्डकपमध्ये अाेव्हरअाॅल अातापर्यंतची सर्वाेत्तम चाैथी माेठी खेळी केली. सर्वात माेठी खेळी अाॅस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कच्या (नाबाद २२९) नावे अाहे. श्रीलंकेच्या चामरीने याच वर्ल्डकपमध्ये अाॅस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १७८ धावा काढल्या हाेत्या. इंग्लंडच्या चार्लाेट एडवर्डने १९९७ च्या वर्ल्डकपमध्ये अायर्लंडविरुद्ध नाबाद १७३ धावांची खेळी केली हाेती. त्यानंतर अाता भारताच्या हरमनप्रीतची नाबाद १७१ धावांची खेळी ठरली.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, या सामन्यातील क्षणचित्रे...
 
हे ही महत्त्वाचे वाचा...
बातम्या आणखी आहेत...