आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुप्तिलमुळे न्यूझीलंडचा द. आफ्रिकेला दणका, मालिकेत 2-2 ने बरोबरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॅमिल्टन - सलामीवीर मार्टिन गुप्तिलच्या नाबाद शतकाच्या (नाबाद १८०) बळावर न्यूझीलंडने हॅमिल्टन वनडेत द. आफ्रिकेला ७ विकेटने हरवले. या विजयासह न्यूझीलंडने पाच सामन्यांच्या मालिकेत २-२ ने बरोबरी केली अाहे. गुप्तिल जगातील असा पहिला खेळाडू ठरला आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय वनडेत तीन वेळा १८० प्लसचा स्कोअर केला आहे. द. आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ८ बाद २७९ धावा काढल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने ४५ षटकांत ३ बाद २८० धावा काढून विजय मिळवला. मालिकेतील पाचवा सामना ४ मार्च रोजी ऑकलंड येथे होईल. गुप्तिलने १३८ चेंडूंचा सामना करताना १८० धावंाची खेळी केली. 
 
मॅन ऑफ द मॅच गुप्तिलने या खेळीत १५ चौकार आणि ११ षटकार ठोकले. टॉस जिंकून द. आफ्रिकेने प्रथम फलंदाजी केली. त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. फाॅर्मात असलेला सलामीवीर क्विंटन डी कॉक पहिल्याच चेंडूवर बाद झाला. यानंतर आमला आणि फॉप डुप्लेसिस यांनी ६५ धावांची भागीदारी केली. आमला ४० धावा काढून बाद झाला. आमलाने ३८चेंडूंत १ षटकार आणि ६ चौकार मारले. डुप्लेसिसने अर्धशतक ठोकले आणि तो ६७ धावा काढून बाद झाला. त्या वेळी आफ्रिकेच्या ४ बाद १४० धावा झाल्या होत्या. डुमिनी २५ धावा काढून परतला. आफ्रिकेची टीम २ बाद १२८ अशा स्थितीतून ६ बाद १५८ अशा संकटात सापडली. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ए.बी.डिव्हिलर्सने स्वत: जबाबदारी घेत डाव सावरला. त्याने नाबाद ७२ धावांची खेळी करून आफ्रिकेला ८ बाद २७९ धावांपर्यंत पोहोचवले. क्रिस मॉरिसने २८ आणि वायने पार्नेलने १२ चेंडूंत २९ धावांची वेगवान खेळी करून कर्णधाराला साथ दिली.  

गुप्तिल नावाचे तुफान अवतरले 
धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. डीन ब्राऊनली अवघ्या ४ धावांवर बाद झाला. कर्णधार केन विल्यम्सनने संघात एक महिन्याने पुनरागमन करणाऱ्या मार्टिन गुप्तिलसोबत ७२ धावांची भागीदारी केली. विल्यम्सन २१ धावा काढून बाद झाला. यानंतर गुप्तिलने मैदानावर साम्राज्य गाजवले. गुप्तिलने वनडे करिअरमधील १२ वे शतक पूर्ण केले. दरम्यान, रॉस टेलरनेही ६६ धावा काढून अर्धशतक झळकावले. टेलर-गुप्तिलने १८० धावांची भागीदारी केली. गुप्तिलने नाबाद १८० धावा ठोकून न्यूझीलंडला ५ षटके शिल्लक ठेवून विजय मिळवून दिला. आफ्रिकेकडून इम्रान ताहीरने २ गडी बाद केले. 
बातम्या आणखी आहेत...