आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणखी ४ वर्षे खेळण्यासाठी "कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनीचे प्रयत्न !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महेंद्रसिंग धोनीला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आणखी किमान चार वर्षे तरी खेळायचे आहे. त्यासाठी तो कधी नव्हे एवढी मेहनत ‘फिट’ राहण्यासाठी घेतोय. मानसिकदृष्ट्या तो जास्त निग्रही झाला आहे, असे धोनीचे माजी प्रशिक्षक एम. पी. सिंग सांगत होते. धोनी बांगलादेश दौर्‍याआधी त्यांच्याकडे आला होता. "दिव्य मराठी'शी दूरध्वनीवर बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

धोनीचे आणखी एक मार्गदर्शक रंजन भट्टाचार्य यांनी तर स्पष्टपणे सांगितले की, "धोनीला आणखी ४ वर्षे मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळायचे आहे. त्याला आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचे नेतृत्व करायचे आहे.'

धोनीचे हे दोन मार्गदर्शक त्याची भारतासाठी अजून खेळण्याची इच्छाशक्ती स्पष्ट करत असतानाच संघ व्यवस्थापन, केवळ बांगलादेशविरुद्धच्या दोन पराभवांवरून धोनीला कमी लेखू नका, असे म्हणत आहे. बांगलादेशविरुद्ध अपयश हे धोनीच्या नेतृत्वाचे अपयश नाही. भारतीय संघ गेले वर्षभर बाहेर सतत खेळतोय. बांगलादेश दौरा म्हणजे या संघाचा यंदाच्या हंगामाच्या समारोपाचा दौरा होता. विश्वचषक विजेता ऑस्ट्रेलियन संघदेखील अलीकडे झिम्बाब्वेकडूनही हरला. विश्वचषक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने ५, तर उपविजेत्या न्यूझीलंडनेही ७ सामने गमावले आहेत. अशा परिस्थितीत भारताने २ सामने गमावल्यानंतर क्रिकेट रसिकांनी निराश होऊ नये, असे संघ व्यवस्थापनाला वाटते.

कसोटी सोडल्याने खेळाडूंशी संपर्क तुटला
- व्यक्तिश: धोनीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास कसोटी क्रिकेट सोडल्यापासून त्याचा भारतीय संघातील खेळाडूंशी असलेला संपर्क तुटला आहे, कमी झाला आहे. कसोटी दौर्‍यासाठी संघ अधिक काळ एकत्र असतो. एकदिवसीय सामने १० ते १५ दिवसांमध्ये उरकले जातात.
- अल्प काळापुरताच खेळाडूंच्या संपर्कात राहणार्‍या धोनीमध्ये सध्या स्वत:च्या असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. त्याची संघातील भूमिका कमी होत चालली आहे. त्याचा परिणाम सध्या नेतृत्वावरही होत आहे. आपले महत्त्व अधोरेखित करण्यासाठीच धोनीने चौथ्या स्थानावर खेळण्याचा निर्णय घेतला.

फलंदाजीवर घेतो आहे मेहनत
संघातील स्वत:चे महत्त्व वाढवण्यासाठी धोनीने बांगलादेश दौर्‍यावर येण्याआधी वैयक्तिक प्रशिक्षक एम. पी. सिंग यांचाही सल्ला घेतला होता. त्याला पूर्वीचे "धोनी क्रिकेट' विश्वाला पुन्हा दाखवायचा आहे. एम. पी. सिंग यांच्या सल्ल्यामुळेच सध्या धोनीने ‘स्टान्स’ बदलला. धोनीच्या बॅटचा ‘स्विंग’ थांबून येत होता, त्यात सिंग यांनी सुधारणा केली. आता फटका खेळताना बॅटची कडा थर्ड मॅनकडे जाते. मोठा फटका किंवा उंचावरचा फटका मारण्यासाठी धोनीने घेतलेला हा पवित्रा आहे. ‘हॅलिकॉप्टर शॉटही’ धोनीला परफेक्ट करायचा आहे.

कसोटी सोडून चूक केल्याची भावना
कसोटी क्रिकेटचे नेतृत्व सोडून राहुल द्रविडने चूक केली होती. त्याचे परिणाम द्रविडने नंतर भोगले. त्याच चुकीची जाणीव आता धोनीलाही व्हायला लागली आहे. कसोटी क्रिकेटचा कालावधी मोठा असतो. भारतीय संघ त्या काळात खेळत असताना रिकामे बसून काय करायचे, हा धोनीपुढे निर्माण झालेला प्रश्न आहे. त्याचे जवळचे मित्र सांगतात, संघाबरोबरचा तुटत चाललेला संपर्क धोनीला आता सलतोय. भारतीय संघ कसोटी खेळत असताना धोनी झारखंडसाठी रणजी खेळण्याची शक्यता कमी आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या संघासोबत राहण्याचा कालावधी कमी आहे. त्यानंतर करायचे काय? हा सध्या धोनीपुढे उभा राहिलेला यक्षप्रश्न आहे.

पराभवाला एकटा धोनी दोषी नाही...
- ऑस्ट्रेलियात पहिली १० षटके सावधपणे खेळणे आवश्यक होते. मात्र, बांगलादेशात संथ खेळपट्ट्यांवर पहिल्या १० षटकांतच हाणामारीने सुरुवात करणे आवश्यक होते. भारतीय संघ येथे कमी पडला हा धोनीचा दोष मानायचा का? ताज्यातवान्या बांगलादेशने उत्तम खेळ केला याबाबत धोनीला दोषी धरायचे? असे भारताच्या अनेक माजी कसोटीपटूंनाही वाटते.
- स्वत: धोनी मात्र कोणत्याही दडपणाला बळी न पडता, पूर्वीपेक्षा अधिक जोमाने, जिद्दीने वाटचाल करण्याचा विचार करत आहे. स्वत:ची संघातील उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी त्याने आता संघाचे क्रिकेट डायरेक्टर रवी शास्त्री यांचाही सल्ला मानण्यास सुरुवात केली आहे, असेही या माजी प्रशिक्षकांनी सांगितले.