आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रेयसने दिली एकाकी झुंज, भारत अ संघाच्या 4 बाद 176 धावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीनदिवसीय  सराव सामन्यात भारत अ संघाच्या श्रेयस अय्यरने शानदार कामगिरी केली. श्रेयसने आग ओकणाऱ्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा समर्थपणे सामना केला.
 
दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत श्रेयस नाबाद ८५ धावांवर खेळत होता. औरंगाबादचा खेळाडू आणि महाराष्ट्राचा रणजीपटू अंकित बावणे २५ धावा काढून बाद झाला. ऑस्ट्रेलियाने शनिवारी आपला पहिला डाव ७ बाद ४६९ धावांवर घोषित केला. यानंतर भारत अ संघाने दिवसअखेर ४ बाद १७६ धावा काढल्या. भारत अ संघ अजून २९३ धावांनी मागे आहे.  
 
ऑस्ट्रेलियाने सकाळी ५ बाद ३२७ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. यादरम्यान मिशेल मार्श आणि मॅथ्यू वेड यांनी शतकी भागीदारी केली. ४३४ धावांच्या स्कोअरवर अखिल हिरवाडकरने मॅथ्यू वेडला ऋषभ पंतकरवी झेलबाद केले. वेडने ६४ धावा काढल्या. त्याने ८९ चेंडूंत ९ चौकारांसह ही खेळी केली. यानंतर मिशेल मार्शही ७५ धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर बाद झाला. नदीमने त्याला इंद्रजितकडे झेल देण्यास भाग पाडले. कर्णधार स्टीव्हन स्मिथने ऑस्ट्रेलियाचा डाव ४६९ धावांवर घोषित केला.   

भारत अ संघाची सुरुवात अत्यंत गचाळ झाली. अखिल हिरवाडकर अवघ्या ४ धावा काढून बाद झाला. यानंतर श्रेयस अय्यरने पांचाळसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, लॉयनने प्रियांकला हँड्सकोम्बकरवी झेलबाद केले. दोन्ही सलामीवीर ६३ धावांत तंबूत परतले होते.   
 
अंकित बावणेची चांगली सुरुवात
प्रियांक बाद झाल्यानंतर अंकित खेळपट्टीवर आला. त्याने तिसऱ्या विकेटसाठी श्रेयस अय्यरसोबत ५७ धावांची भागीदारी केली. दोघे डाव सावरत आहेत असे वाटत असतानाच जॅक्सन बर्डने अंकितला पायचीत केले. अंकितने चांगली सुरुवात केली, मात्र तो मोठी खेळी करू शकला नाही. अंकितने ४८ चेंडूंचा सामना करताना  ४ चौकारांसह २५ धावा काढल्या. 
 
श्रेयसची एकाकी झुंज
एका टोकाहून एकेक गडी बाद होत असताना दुसऱ्या टोकाने श्रेयस अय्यरने नाबाद अर्धशतक ठोकले. श्रेयसने आक्रमक खेळी केली. त्याने अवघ्या ९३ चेंडूंत ५ षटकार आणि ७ चौकारांसह नाबाद ८५ धावा ठोकल्या. दिवसाचा खेळ संपला त्या वेळी श्रेयससोबत युवा फलंदाज ऋषभ पंत ३ धावांवर नाबाद होता. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लॉयन आणि जॅक्सन बर्ड या दोघांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. 
 
मी दावेदार : श्रेयस
मी सलगपणे चांगली कामगिरी करत आहे.  भारतीय संघाकडून खेळण्याचा मी प्रबळ दावेदार आहे, अशी प्रतिक्रिया श्रेयस अय्यरने व्यक्त केली. मी भारताकडून खेळण्याबाबत फार विचार करत नाही. मी प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करत असतो, असे श्रेयस अय्यरने या वेळी म्हटले.
बातम्या आणखी आहेत...