आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराव सामना: ईशांत शर्माचा ‘पंच’; भारताला आघाडी, श्रीलंका अध्यक्षीय इलेव्हनचा धुव्वा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबो- फॉर्मात असलेल्या टीम इंडियाने आगामी कसोटीची कसून तयारी करत असल्याचे संकेत दिले. भारतीय संघाने शुक्रवारी यजमान श्रीलंका अध्यक्षीय इलेव्हन संघाविरुद्ध एकमेव सराव सामन्यात शानदार खेळी केली. ईशांत शर्माच्या (५/२३) शानदार गोलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने यजमान टीमचा घरच्या मैदानावर पहिल्या डावात अवघ्या १२१ धावांत खुर्दा उडवला. त्यामुळे भारताला पहिल्या डावात २३० धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात तीन बाद ११२ धावा काढल्या. यातूनच भारताला ३४२ धावांची आघाडी घेता आली. दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारा (नाबाद ३१) आणि राहुल (नाबाद ४७) हे दोघे मैदानावर खेळत आहेत. दुसऱ्या डावात कोहली (१८) व रोहित शर्माने (८) भारताला दमदार सुरुवात करून दिली.

तसेच भारताकडून गोलंदाजीत ईशांतपाठोपाठ वरुण अॅरोन (२/४२) आणि आर. अश्विनने (२/८) प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. त्यामुळे यजमान टीमला पहिला डाव लवकर गुंडाळावा लागला. यासह टीम इंडियाने सराव सामन्यात जवळजवळ आपला विजय निश्चित केला.

पाहुण्या भारतीय संघाने शुक्रवारी दुसऱ्या दिवशी ६ बाद ३१४ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. अजिंक्य रहाणे (१०९) रिटायर्ड झाल्याने तंबूत परतला. त्यानंतर आर.अश्विनने २३ धावांची खेळी केली. हरभजनने १५ व भुवनने नाबाद ९ धावांचे योगदान दिले. त्यामुळे भारताने पहिल्या डावात ३५१ धावा काढल्या.

ईशांतने गाजवला दुसरा दिवस
यजमान श्रीलंकेविरुद्ध कसोटीत उल्लेखनीय कामगिरीसाठी सज्ज असल्याचे ईशांतने दाखवून दिले. त्याने सराव सामन्याचा दुसरा दिवस गाजवला. त्याने सात षटकांत २३ धावा देत ५ गडी बाद केले. यासह त्याने यजमानांचा निम्मा संघ तंबूत पाठवला. याशिवाय त्याने एक निर्धाव षटक टाकले. त्यामुळे यजमानांनी पहिल्या डावात १२१ धावांत आपला गाशा गुंडाळला.
डिकवेलची झुंज
श्रीलंका अध्यक्षीय इलेव्हन संघाकडून डिकवेलने एकाकी झुंज दिली. त्याने संघाकडून सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली. त्याने ५३ चेंडूंत ४८ धावा काढल्या. त्यामुळे यजमान टीमला धावसंख्येला गती देता आली. याशिवाय श्रीवर्धनेने ३२ आणि गुणथिलकाने २८ धावांचे याेगदान दिले.

ईशांतचे पाच बळी
१.१ षटक- पहिला बळी (सिल्व्हा)
१.६ षटक- दुसरा बळी (डिसिल्व्हा)
३.१ षटक- तिसरा बळी (थरंगा)
७.२ षटक- चौथा बळी (थिरिमाने)
७.३ षटक- पाचवा बळी (परेरा)