आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीनदिवसीय सराव सामना बरोबरीत सुटला, भारताचा दुसरा डाव १८० धावांत आटोपला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबो - टीम इंडिया आणि श्रीलंका अध्यक्षीय संघादरम्यानचा तीनदिवसीय सराव सामना ड्रॉ झाला. भारताने पहिल्या डावा ३५१ धावा काढल्यानंतर श्रीलंका अध्यक्षीय संघाला १२१ धावांत गुंडाळले. यानंतर भारताचा दुसरा डाव अवघ्या १८० धावांत आटोपला. पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर भारताने यजमान संघासमोर ४११ धावांचे लक्ष्य ठेवले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत श्रीलंका अध्यक्षीय संघाने ६ बाद २०० धावा काढल्या.

तिसऱ्या दिवशी सकाळी भारताने ३ बाद ११२ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. पुजारा ३१, तर के. राहुल ४७ धावांवर खेळत होते. दोघेही याच स्कोअरवर निवृत्त झाले. भारताच्या उर्वरित फलंदाजांना सराव व्हावा यासाठी हे दोघे निवृत्त झाले. अार. अश्विन आणि हरभजनसिंग मैदानावर उतरले. दोघांना मोठी खेळी करता आली नाही. अश्विन शून्यावर, तर हरभजन ४ धावा काढून बाद झाला. अमित मिश्रा ७ धावा काढून परतला. तळाचा फलंदाज भुवनेश्वरकुमारने मात्र ३७ धावांचे योगदान दिले. त्याने ५६ चेंडूंचा सामना करताना ५ चौकार मारले. वरुण अॅरोन २, तर उमेश यादवने १७ धावांचे योगदान दिले. भुवनेश्वर आणि उमेशच्या खेळीने भारताला १८०
धावांपर्यंत पोहोचवले. श्रीलंका अध्यक्षीय संघाकडून फर्नांडो, रजिथा यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

कुशल, थरंगाची अर्धशतके
पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर भारताने यजमान संघासमोर ४११ धावांचे विजयासाठी लक्ष्य दिले. यजमान संघाकडून सलामीवीर कुशल सिल्वा (८३) आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या उपुल थरंगा (५२) यांनी अर्धशतके ठोकली. सलामीवीर डिसिल्वा ६, तर कर्णधार लाहिरू थिरिमाने १८ धावा काढून बाद झाले. श्रीलंका संघाने ५९ धावांत २ विकेट गमावल्या होत्या. यानंतर सिल्वा आणि थरंगा यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली.

उपुल थरंगाने ५४ चेंडूंत १ षटकार, ८ चौकारांसह ५२ धावा काढल्या. मधल्या फळीचे फलंदाज सिरिवर्धने ४, तिसरा परेरा १, जयसूर्या ५ हे लवकर बाद झाले. तळाचा फलंदाज पथिरानाने नाबाद २५ धावा काढल्या. एका टोकाहून एकेक गडी बाद होत असताना दुसऱ्या टोकाने कुशल सिल्वाने नाबाद ८३ धावा जोडल्या. त्याने १६३.चेंडूंत ६ चौकारांसह ८३ धावा जोडल्या.

अश्विनच्या ३ विकेट
भारताकडून दुसऱ्या डावात ऑफस्पिनर आर. अश्विनने ३८ धावांत ३ विकेट, तर उमेश यादव, वरुण अॅरोन आणि हरभजनसिंग यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. पहिल्या कसोटीसाठी संघ निवड करताना अश्विन, हरभजन, ईशांत यांची निवड पक्की आहे. अॅरोन, उमेश यादव, अमित मिश्रा यांच्यापैकी दोघांना संधी मिळेल.

संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव ३५१. श्रीलंका अध्यक्षीय संघ पहिला डाव १२१. भारत दुसरा डाव १८०. (चेतेश्वर पुजारा ३१, लोकेश राहुल ४७). श्रीलंका अध्यक्षीय संघ दुसरा डाव ६ बाद २००. (कुशल सिल्वा नाबाद ८३, थरंगा ५२, ३/३८ अश्विन.)