आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रो कबड्डीने खेळाडूंना मोठे केले : उदय शंकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रो कबड्डीने खेळ आणि खेळाडू या दोघांना मोठे केले. खेळाला ग्लॅमर आले. खेळात पैसा आला. खेळाडूंची प्रतिमा चमकली, असे मत स्टार स्पोर्ट््सचे सीईओ उदय शंकर यांनी "दिव्य मराठी' आणि "भास्कर' समूहाशी बाेलताना व्यक्त केले.
प्रश्न : टेलिव्हिजन प्रेक्षकांना हा खेळ किती, कसा आणि का आवडला?
उदय शंकर : आत्तापर्यंत भारताचा हा देशी खेळ खुल्या दिलाने व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन कुणीही पेश केला नव्हता. ती गोष्ट आम्ही केली. रंगीत कोर्ट, रंगीबेरंगी कपडे, साथीला संगीताची मेजवानी, विविधरंगी प्रकाशझोतातील दिव्यांची रोषणाई आणि या नव्या वातावरणात भारतातील आणि अन्य १३ देशांतील दर्जेदार कबड्डीपटूंचा खेळ आम्ही पेश केला. शारीरिक चपळता, ताकद आणि बुद्धिकौशल्य, चातुर्य आदी गुणांनी संपन्न असलेल्या कबड्डीपटूंच्या खेळाला आमच्या आधुनिक तंत्रज्ञानाची व कौशल्याची जोड लाभली. त्यातून निर्माण झालेले ‘प्रो कबड्डी लीग’ हे रत्न तमाम विश्वाला भावले. आत्तापर्यंत प्रत्येक जण आयुष्यात कधी ना कधी हा खेळ खेळला होता.

प्रश्न : हा खेळ टेलिव्हिजन प्रेक्षकांसाठी सादर करताना काय बदल केले?
उदय शंकर : आंतरराष्ट्रीय व भारतीय कबड्डी फेडरेशनच्या नियमांच्या चौकटीत राहूनच जे काम करायचे ते केले. नियमांची तोडफोड केली नाही. मात्र खेळ अधिक वेगवान व्हावा यासाठी काही छोटे बदल केले. दम घेण्याऐवजी ३० सेकंदांची चढाई निश्चित केली. मात्र यंदापासून दम घेऊन चढाई करण्याचा नियम कायम ठेवला. २ टाइम आउट्स ठेवले. टीव्ही रेफरल यंदापासून सुरू केले. ८५ किलो वजनाची मर्यादा निश्चित केली.

प्रश्न : कबड्डी या खेळासाठी तुम्ही काय केले?
उदय शंकर : या खेळाला प्रसिद्धीचा ‘स्पार्क’ हवा होता, तो आम्ही दिला. कबड्डी खेळाडूंना स्वत:ची अोळख करून दिली. आतापर्यंत कबड्डीपटूंना खेळण्यासाठी पैसे मिळत नव्हते. सहा आठवड्यांच्या अवधीसाठी देशातील अ, ब व क श्रेणीतील खेळाडूंना त्यांच्या दर्जानुसार चांगले मानधन मिळाले. कबड्डीपटूंना २०-२१ लाख रुपयांपर्यंतचे मानधन अपेक्षित नव्हते. त्याचबरोबर ज्युनियर खेळाडूंनाही त्यांच्या शिक्षणासाठी किंवा अन्य गरजांसाठी आर्थिक मदत झाली. कबड्डीपटूंना मिळणारे हे मानधन मोठे नाही, याची आम्हाला कल्पना आहे. पण कुठेतरी सुरुवात झाली आहे, हे चांगले आहे. प्रो कबड्डीनंतर प्रत्येक खेळाडूला, तमाम भारतात लोक नावाने ओळखायला लागले. विमानतळावर व अन्य सार्वजनिक ठिकाणी कबड्डीपटूंच्या स्वाक्षऱ्या घ्यायला लागले, ‘सेल्फी’ काढायला लागले. विमानतळावरचे सुरक्षा कर्मचारीही क्रिकेटपटूंप्रमाणेच कबड्डीपटूंनाही अधिक मान द्यायला लागले. कबड्डीपटूंना प्रो कबड्डीने स्वत:ची ओळख निर्माण करून दिली.

..तर वर्षभर उत्साह
आम्हालाही वर्षभर कबड्डीसाठी काहीतरी करावेसे वाटते. प्रत्यक्षात अन्य व्याप पाहता ते शक्य होणार नाही. खेळाचे संघटक व सरकारने या कामी पुढाकार घेऊन जर योजना आखली, तर प्रो कबड्डीने निर्माण झालेला जोश वर्षभर टिकायला अडचण येणार नाही.
बातम्या आणखी आहेत...