आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Duplesis Says R Ashwin Could Be Threat To South Africa Team In Test Series

कसोटीत आफ्रिकेला अश्विनचा धसका, आफ्रिकेच्या डुप्लेसिसची कबुली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माेहाली - टी-२० आणि वनडे मालिका जिंकल्यानंतर चंदिगडला पोहोचलेला पाहुणा दक्षिण आफ्रिकेचा संघ उत्साहित आहे. मात्र, कसोटीत वेगवान गोलंदाजीपेक्षा फिरकी कामी येईल, याची त्यांना जाणीव आहे. कसोटी मालिकेत फिरकी सर्वाधिक धोकादायक ठरू शकते, अशी स्पष्ट कबुली आफ्रिकेचा अव्वल फलंदाज फॉप डुप्लेसिसने दिली आहे. आफ्रिकेला सर्वाधिक धोका आर. अश्विनपासून असेल. तो दुखापतीतून सावरल्यानंतर चंदिगडला पोहोचणार आहे. तो यजमानांसाठी फायदेशीर ठरू शकतो, असेही त्याने म्हटले.

भारताने मोहालीत स्वत:ची अनुकूल खेळपट्टी तयार केली असेल, हे आम्हाला माहिती आहे. यात नवे नाही. सर्व संघ असेच करतात. पहिल्या दिवसापासून मोहालीत खेळपट्टी फिरकीला मदत करेल, असे आम्हाला वाटते. मोहालीची खेळपट्टी थोडी वेगळी आहे. येथे वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. आम्ही या संधीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करू, असेही डुप्लेसिस म्हणाला.

अश्विन भारताचे शक्तिस्थान
भारताचे सर्वांत मोठे शस्त्र म्हणजे आर. अश्विन आहे. तो अधिकाधिक विकेट घेऊ शकतो. आम्ही टी-२० मध्ये त्याचा सामना केला आहे. मात्र, कसोटीत चित्र, परिस्थिती वेगळी असते. मोहालीचे आफ्रिकेला सर्वाधिक धोका अश्विनकडूनच आहे. आम्हाला कसोटी मालिका जिंकायची असेल तर अश्विनचा तोडगा काढावा लागेल. येथील खेळपट्टी खूप कोरडी दिसत आहे. बहुदा येथे पहिल्या दिवसापासून फिरकीला मदत मिळेल, असेही डुप्लेसिसने नमूद केले.

खेळपट्टीची तक्रार करणे चुकीचे
मुंबईच्या खेळपट्टीबाबत निर्माण झालेल्या वादाबाबत डुप्लेसिस म्हणाला, खेळपट्टीची तक्रार करणे योग्य नाही. दोन्ही संघांसाठी खेळपट्टी एकसमान होती. पराभवाचे कारण खेळपट्टीवर फोडण्याचा हा प्रकार आहे. खेळपट्टी फलंदाजांसाठी शानदार होती. आमच्या फलंदाजांनी त्यावर दमदार फलंदाजी केली. येत्या कसोटी मालिकेतही असाच शानदार फॉर्म कायम ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे तो म्हणाला.

दक्षिण आफ्रिका मोहालीत पहिल्यांदा कसोटी खेळणार
मोहालीच्या आय.एस.बिंद्रा स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका टीम पहिल्यांदा कसोटी सामना खेळेल. यामुळे भारताचा येथे सामना करणे त्यांच्यासाठी सोपे नसेल. भारतात कसोटी खेळणे, नेहमीच आव्हानात्मक ठरले आहे. मोहालीचे मैदान शानदार आहे. आम्ही येथे निश्चितपणे चांगल्या क्रिकेटचा आनंद लुटू. पहिल्या कसोटीसाठी या मैदानावर खेळण्यास आम्ही आतूर अाहोत. आमचे खेळाडू कसोटीत भारतासोबत दोन हात करण्यास सज्ज आहेत, असेही तो म्हणाला.

भारत आज करणार सराव
दिल्लीत हरभजनसिंगच्या रिसेप्शनमध्ये सामील झाल्यामुळे भारतीय टीम रविवारच्या जागी सोमवारी दुपारी िवराट कोहलीच्या नेतृत्वात चंदीगडला दाखल झाली. भारतीय संघ सोमवारी सराव करेल. भारतीय खेळाडूंनी शहरात दाखल झाल्यानंतर विश्रांतीला प्राधान्य दिले. मात्र, कर्णधार कोहली, सपोर्ट स्टाफ आणि फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगरसह मैदानावर पोहोचला. त्यांनी खेळपट्टीची पाहणी करून रणनीतीबाबत चर्चा केली. कोहली पहिल्यांदा कर्णधार म्हणून या मैदानावर खेळेल. तो येथे निश्चितपणे भारताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. भारतीय टीम येथे पहिल्यांदा सचिन तेंडुलकरशिवाय मैदानावर उतरेल.