आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND A Vs ENG: रहाणे, ऋषभ पंत चमकले; भारत अ संघ सहज विजयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वनडे मालिकेआधी भारत अ संघाने पाहुण्या इंग्लंडला ६ विकेटने पराभूत करण्याची कामगिरी केली. भारत अ संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे, शेल्डन जॅक्सन अणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकांच्या मदतीने भारत अ संघाने इंग्लंडला दुसऱ्या आणि अखेरच्या सराव सामन्यात ६२ चेंडू आणि ६ विकेट शिल्लक ठेवून हरवले.   

इंग्लंड संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारत अ संघांच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करताना इंग्लंडला ५० षटके पूर्ण होण्याआधीच ४८.५ षटकांत सर्वबाद २८२ धावांत गुंडाळले.   

रहाणे-जॅक्सनची शतकी सलामी 
धावांचा पाठलाग करताना भारत अ संघाने शानदार सुरुवात केली. भारत अ संघाकडून कर्णधार अजिंक्य रहाणे आणि जॅक्सन यांनी ११९ धावांची शतकी सलामी दिली. जॅक्सनने ७ चौकारांच्या साह्याने ५९ धावा काढल्या. यानंतर रहाणेने युवा खेळाडू ऋषभ पंतसोबत डाव सावरला. ऋषभ पंतने अवघ्या ३६ चेंडूंचा सामना करताना २ षटकार आणि ८ चौकारांच्या साह्याने ५९ धावा ठोकल्या. आदिल रशीदने पंतला बाद करून इंग्लंडला दुसरे यश मिळवून दिले. रहाणेला इंग्लंडचा गोलंदाज डेव्हिड विलीने ९१ धावांवर त्रिफळाचीत केले. रहाणेचे शतक ९ धावांनी हुकले. त्याने ८३ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि १० चौकार मारले. रहाणे २३३ धावांवर तिसऱ्या फलंदाजाच्या रूपाने बाद झाला. तोपर्यंत भारत अ संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. अनुभवी सुरेश रैनाने ३४ चेंडूंत ७ चौकारांसह ४५ धावा ठोकल्या. दीपक हुड्डाने नाबाद २३ धावा काढून विजयावर शिक्कामोर्तब केले.   

तत्पूर्वी, इंग्लंडच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली. सलामीवीर जेसन राॅय आणि अॅलेक्स हेल्स यांनी ४२ धावांची सलामी दिली. हेल्सने ५३ चेंडूंत ८ चौकारांसह ५१ धावा काढल्या. जेसन रॉॅयने १५ चेंडूंत झटपट २५ धावा काढल्या जॉनी बेयरस्ट्रोने ६५ चेंडूंत १० चौकारांसह ६४ धावा काढल्या. इंग्लंडकडून ही सर्वोच्च खेळी ठरली. बेन स्टोक्सने ३८ धावांचे योगदान दिले. अखेरच्या षटकांत आदिल रशीदने चांगली फलंदाजी करताना ४२ चेंडूंत ४ चौकारांसह ३९ धावा जोडल्या. अकराव्या क्रमांकाचा फलंदाज विलीने ३० चेंडूंत २ चौकार, २ षटकारांसह नाबाद ३८ धावा कुटल्या. त्याच्या खेळीमुळेच इंग्लंडला २८२ धावांचा टप्पा गाठता आला.
 
ऋषभ पंतचे ४ झेल 
टीम इंडियाचा भविष्याचा विकेटकीपर म्हणून सध्या चर्चेत असलेल्या ऋषभ पंतने शानदार यष्टिरक्षण करताना ४ झेल घेतले. त्याने बेयरस्ट्रो, मोईन अली, आदिल रशीद आणि प्लंकेट यांचे झेल घेतले. ऋषभ पंतने फलंदाजीतही योगदान देताना १६३.८८च्या स्ट्राइक रेटने ३६ चेंडूंत ५९ धावा ठोकल्या. सामन्यानंतर रहाणेने पंतची स्तुती केली.
 
परवेज रसूलच्या ३ विकेट
भारताकडून अष्टपैलू ऑफस्पिनर परवेज रसूलने ३८ धावांत सर्वाधिक ३ गडी बाद केले. प्रदीप संगवानने ६४ धावांत २, शाहबाज नदीमने ५५ धावांत २ गडी बाद केले. सिद्धार्थ कौलने एकाला बाद केले.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, आजच्या सामन्यातील ठळक क्षणचित्रे....