आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्थिवच्या दमदार शतकाने गुजरात 83 वर्षांनी ठरले रणजी चॅॅम्पियन, जुनेजाचे अर्धशतक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - कर्णधार पार्थिव पटेलने ठोकलेल्या शतकाच्या (१४३) बळावर गुजरातने इतिहास रचताना पहिल्यांदाच रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. रणजीच्या फायनलमध्ये गुजरातने गतविजेत्या आणि ४१ वेळा रणजी चॅम्पियन मुंबईला पाच विकेटने पराभूत करून ऐतिहासिक कामगिरी केली. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर गुजरातसमोर विजयासाठी ३१२ धावांचे लक्ष्य होते. गुजरातने विजयासाठी ३१२ धावांचा यशस्वी पाठलाग करताना रणजी ट्राॅफी जिंकली. ८३ वर्षांच्या इतिहासात गुजरात रणजी ट्राॅफी जिंकणारी १७ वी टीम ठरली. शिवाय रणजीच्या फायनलमध्ये सर्वाधिक धावांचे लक्ष्य गाठण्याचा विक्रमही गुजरातने आपल्या नावे केला. याआधी रणजी ट्राॅफीच्या फायनलमध्ये हैदराबादने नवानगरविरुद्ध १९३७-३८ मध्ये ३१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला होता. तो विक्रम गुजरातने मोडला. याआधी गुजरातने फक्त एकदा रणजीच्या फायनलमध्ये १९५०-५१ मध्ये प्रवेश केला होता. त्या वेळी फायनलमध्ये गुजरातचा पराभव झाला होता.  गुजरातला चॅम्पियन बनवण्यात पार्थिव पटेलने शानदार योगदान दिले. त्याने संघ संकटात असताना १४३ धावांसह शतक ठोकून मुंबईला किताबापासून दूर ठेवले. मुंबईविरुद्ध पार्थिव पटेलचे हे पाचवे प्रथम श्रेणी शतक होते.  इतर काेणत्याही संघाविरुद्ध त्याने दोनपेक्षा अधिक शतके ठोकलेली नाहीत, हे विशेष.   

गुजरातने टॉस जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजी दिली. मुंबईचा पहिला डाव २२८ धावांत आटोपला. यानंतर गुजरातने ३२८ धावा काढून पहिल्या डावात १०० धावांची आघाडी घेतली. मुंबईने दुसऱ्या डावात ४११ धावा काढून गुजरातपुढे ३१२ धावांचे लक्ष्य ठेवले हेाते. गुजरातने अखेरच्या दिवशी  ५ विकेट गमावून हे लक्ष्य गाठले. गुजरातकडून रुजुल भट्टने २७ व चिराग गांधीने नाबाद ११ धावा काढल्या. गुजरातने बिनबाद ४७ वरून पुढे सुरू केला. प्रियांक पांचाळ (३४)व भार्गव (२) स्वस्तात बाद झालेे. अभिषेक नायरने समितला (२१) झेलबाद करून मुंबईला यश मिळवून दिले.   
 
पार्थिव-मनप्रीतची शतकी भागीदारी
३ बाद ८९ धावा अशा स्कोअरवरून गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेल व मनप्रीत जुनेजाने डाव सावरला. त्यांनी चौथ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली. मनप्रीत जुनेजाने ११५ चेंडूंत ८ चौकारांसह ५४ धावा काढल्या. कर्णधार पार्थिव पटेलने आक्रमक फलंदाजी करताना गुजरातला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले.
 
हेही आहे महत्त्वाचे
-    
गुजरातने ८३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच रणजीचे विजेतेपद जिंकले आहे.
-    गुजरात रणजी ट्रॉफी जिंकणारी १७ वी टीम ठरली आहे. 
-     देशांतर्गत तीन (१. रणजी ट्रॉफी. २. विजय हजारे ट्रॉफी. ३. सै. मुश्ताक अली ट्रॉफी) मुख्य स्पर्धांचे विजेतेपद जिंकणारी गुजरात ठरली तिसरी टीम.
-    रणजीच्या फायनलमध्ये शतक ठोकणारा पार्थिव पटेल तिसरा विकेटकीपर फलंदाज ठरला आहे.