आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranji Trophy Final: Shreyas Iyer Sets Records In Mumbai's Recovery

रणजी फायनल : सौराष्ट्रविरुद्ध पहिल्या डावात मुंबईला २७ धावांची आघाडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - जबरदस्त फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यरच्या रणजी सत्रातील चौथ्या शतकाच्या (११७ धावा) बळावर ४० वेळेसची चॅम्पियन मुंबईने सौराष्ट्रविरुद्ध रणजी ट्रॉफी फायनलच्या दुसऱ्या दिवशी २७ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. सौराष्ट्राला पहिल्या डावात २३५ धावांवर रोखल्यानंतर मुंबईने पहिल्या डावात दुसऱ्या दिवसअखेर ८ बाद २६२ धावा काढल्या.

मुंबईकडून श्रेयस अय्यरने १४२ चेंडूंचा सामना करताना ११७ धावा काढल्या. या खेळीत त्याने १५ चौकार आणि २ षटकार मारले. मुंबईची टीम एक वेळ २ बाद १७५ धावा अशा मजबूत स्थितीत होती. मात्र, यानंतर सौराष्ट्राने ७५ धावांत मुंबईच्या ६ विकेट घेऊन सामन्यात पुनरागमन केले. मुंबईकडून श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव (४८) यांनी तिसऱ्या विकेटसाठी १५२ धावांची भागीदारी केली. मंुबईची सुरुवात चांगली झाली नाही. मुंबईचे दोन्ही सलामीवीर अवघ्या २३ धावांत तंबूत परतले. अखिल हेरवाडकर शून्यावर, तर भाविन ठक्कर ६ धावा काढून बाद झाले. दोघांना जयदेव उनादकटने बाद केले. यानंतर श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्या भागीदारीने मुंबईचा डाव सावरला. सौराष्ट्राच्या जानीने श्रेयसला बाद करून ही भागीदारी मोडली. यानंतर मुंबईचे फलंदाज एकापाठोपाठ बाद होत गेले. शेलीदार फलंदाज सूर्यकुमार यादवने ११२ चेंडूंचा सामना करताना ७ चौकारांच्या साहाय्याने ही खेळी केली.

मधली फळी कोलमडली
मुंबईच्या मधल्या फळीच्या फलंदाजांनी साथ दिली नाही. अय्यर बाद झाल्यानंतर कर्णधार आदित्य तारेही लवकर बाद झाला. तारेने १७ चेंडूंत ४ चौकारांसह १९ धावा काढल्या. अभिषेक नायर १९ धावा काढून चालता झाला. या दोघांच्या विकेटने मुंबई बॅकफूटवर गेली. धवल कुलकर्णीने १ तर शार्दूल ठाकूर शून्यावर बाद झाला. नायर, धवन आणि शार्दूल या तिघांना राठोडने बाद केले. एका टोकाहून एकेक गडी बाद हाेत असताना दुसऱ्या टोकाने मधल्या फळीत सिद्धेश लाडने डाव सावरला. दिवसाचा खेळ संपला त्या वेळी लाड २२ धावांवर नाबाद होता. लाडने ५७ चेंडंूचा सामना करताना ३ चौकारांच्या साह्याने ही खेळी केली. सौराष्ट्रकडून राठोडने ३ तर जयदेव उनादकट आणि जानी यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. मुंबईची मदार आता सिद्धेश लाडवर असेल. तो तिसऱ्या दिवशी किती धावा काढतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. इक्बालही फलंदाजी करू शकतो.

मंकडची अर्धशतकी झुंज
सकाळी सौराष्ट्रकडून तळाचा फलंदाज मंकडने अर्धशतक ठोकले. त्याने १४२ चेंडूंचा सामना करताना ६ चौकारांच्या साहाय्याने ६६ धावा काढल्या. जयदेव उनादकटने ३१ धावांचे योगदान दिले. मुंबईकडून धवल कुलकर्णीने ५ विकेट, तर शार्दूल ठाकूरने ३ विकेट घेतल्या.

अय्यरच्या सत्रात १३२१ धावा
श्रेयस अय्यरने या सत्रात आपल्या धावांची संख्या १३२१ इतकी पोहोचवली आहे. एका रणजी सत्रात सर्वाधिक धावा काढण्याच्या यादीत त्याने केदार जाधव (१२२३ धावा), वसीम जाफर (१२६० धावा) आणि विजय भारद्वाज (१२८०) यांना मागे टाकून श्रेयस अय्यर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. श्रेयसच्या पुढे आता फक्त व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (१४१५ धावा) आहे. अय्यरने या सत्रात ११ व्यांदा ५० प्लस स्कोअर केला आहे. याबाबत तो विजय भारद्वाज (१९९८-९९) आणि अभिषेक नायर (२०१२-१३) यांच्या बरोबरीत पोहोचला आहे. फायनलमधील शतकाने श्रेयस दिग्गजांच्या पंक्तित जाऊन बसला आहे.