आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Second One Day Match Of India Against Australia Today

विजयाचा पतंग उडणार ?, ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय गोलंदाजांची परीक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिस्बेन - भारत आणि ऑस्ट्रेलियात पाच वनडे सामन्यांतील दुसरी लढत शुक्रवारी खेळवली जाईल. पर्थच्या मैदानावर झालेल्या पहिल्या लढतीत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या वनडेत ३०९ धावा काढल्यानंतरसुद्धा भारताचा पराभव झाला होता. सुमार गोलंदाजीचा फटका भारताला बसला. शुक्रवारी गाबाच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी धोनी ब्रिगेडला गोलंदाजीत उत्तम प्रदर्शन करावे लागेल.

पर्थची वाकाची खेळपट्टी अपेक्षेविरुद्ध संथ होती. मात्र, गाबात असे होणार नाही. येथे धोनी चार वेगवान गोलंदाजांसह खेळण्याचा निर्णय घेऊ शकतो. भारताचे दोन्ही फिरकीपटू पर्थ येथे चांगलेच महागडे ठरले होते. अश्विनने ९ षटकांत ६८ धावांत २ विकेट, तर जडेजाने ६१ धावा दिल्या होत्या. त्याला एकही विकेट मिळू शकली नाही. पर्थवर डावखुरा वेगवान गोलंदाज बरिंदर सरनने शानदार प्रदर्शन करून ५६ धावांत ३ गडी बाद केले होते. संघ व्यवस्थापनाला त्याच्याकडून या वेळीही अशाच कामगिरीची आशा असेल.

चार वेगवान गोलंदाज शक्य
गाबावर ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी महेंद्रसिंग धोनी आणि भारताला सर्व क्षेत्रांत चांगली कामगिरी करावी लागेल. इशांत शर्मा फिट असून, तो निवडीसाठी उपलब्ध आहे. भुवनेश्वरच्या जागी इशांत खेळू शकतो. धोनीने चार वेगवान गोलंदाजांसह खेळण्याचा निर्णय घेतला तर उमेश यादव, इशांत, बरिंदर सरन आणि ऋषी धवन हे चाैघे खेळू शकतात. अशात जडेजा किंवा अश्विन यांच्यापैकी एकाला संघाबाहेर जावे लागेल. अश्विनच्या जागी ऋषी धवन खेळू शकतो.

बरिंदरकडून आशा
पर्थवर डावखुरा वेगवान गोलंदाज बरिंदर सरनने दमदार प्रदर्शन करताना ५६ धावांत ३ गडी बाद केले होते. त्याच्याकडून गाबावर अशाच प्रदर्शनाची आशा असेल. भारताचे उर्वरित दोन गोलंदाज उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमार पर्थवर निष्प्रभ ठरले होते. भुवनेश्वरने कमी धावा दिल्या. मात्र, यादव महागडा ठरला होता. मात्र, दोघेही यजमान ऑस्ट्रेलियन फलंदाजांना थोडेही अडचणीत आणू शकले नाहीत.

फलंदाजी मजबूत
दुसऱ्या वनडेत वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत मिळेल, अशी आशा आहे. खेळपट्टीवर गवत नसले तरीही चेंडूला वेग निश्चित मिळेल. पहिल्या वनडेत भारताकडून रोहितने १७१, तर कोहलीने ९१ धावा काढल्या होत्या. या दोघांच्या बळावर भारताने ३०९ धावांचा डोंगर उभा केला हाेता. भारतीय फलंदाजी मजबूत असून, ३०९ हा चांगला स्कोअर आहे, असे धोनीने स्वत: म्हटले होते.

वॉर्नरच्या जागी शॉन मार्श
डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीत मिशेलचा भाऊ शॉन मार्श प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळू शकतो. फॉर्मात असलेल्या उस्मान ख्वाजाचीही वनडेत वर्णी लागली आहे. जॉन हेस्टिंगही खेळू शकतो.
स्मिथ-बेलीचे आव्हान
भारतीय संघ ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्हन स्मिथच्या फॉर्ममुळे चिंतेत असेल. विजयासाठी कठीण ३१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून स्मिथने १४९ धावा, तर बेलीने ११२ धावा ठोकल्या होत्या. स्मिथ भारताविरुद्ध यशस्वी ठरतोच. त्याने भारताविरुद्ध वनडे, कसोटीत मिळून मागच्या काही सामन्यांत १६२*, ५२*, १३३, २८, १९२, १४, ११७, ४७, १०५ आणि १४९ धावा काढल्या आहेत. भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच वनडे सामन्यांची मालिका जिंकायची असेल तर स्मिथला लवकर बाद करण्याचा तोडगा शोधावा लागेल. जॉर्ज बेली तर भारताविरुद्ध हमखास यशस्वी ठरतो. मागच्या सामन्यात अडचणीच्या वेळी त्याने शतक ठोकून सामना फिरवला. स्मिथला त्याने जबरदस्त साथ दिली होती. स्मिथशिवाय बेलीचेही भारतीय गोलंदाजांसमोर आव्हान असेल.

दोन्ही संभाव्य संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, ऋषी धवन, ईशांत शर्मा, उमेश यादव, भुवनेश्वरकुमार,
बरिंदर सरन.
ऑस्ट्रेलिया : स्टिव्हन स्मिथ (कर्णधार), शॉन मार्श, अॅरोन फिंच, जॉर्ज बेली, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड, जेम्स फॉकनर, केन रिचर्डसन, जॉन हेस्टिंग, स्कॉट बोलेंड, जोस हेझलवूड, जोएल पॅरिस.