आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Second Test Today, After The Match Sangakara Will Retire

श्रीलंकेचा दौरा : आजपासून दुसरी कसोटी, या सामन्‍यानंतर निवृत्‍त होणार संगकारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबो - भारत आणि यजमान श्रीलंकेदरम्यान तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरी लढत गुरुवारपासून सुरू होत आहे. पी. सारा. ओव्हल स्टेडियमवर होणाऱ्या या कसोटीनंतर श्रीलंकेचा महान फलंदाज कुमार संगकारा क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. हा सामना जिंकून संगकाराला विजयी निरोप देण्यासाठी श्रीलंकेचे प्रयत्न असतील. दुसरीकडे टीम इंडिया ही लढत जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल. भारताने पहिली कसोटी गमावल्याने श्रीलंका सध्या मालिकेत १-० ने पुढे आहे. थेट प्रक्षेपण सकाळी १०.०० वाजेपासून सोनी सिक्स चॅनलवर होईल.

पी. सारा. ओव्हल स्टेडियमवर भारताने आतापर्यंत ४ कसोटी सामने खेळले आहेत. यात श्रीलंकेने दोन जिंकले असून एक सामना ड्रॉ आणि एक लढत भारताने जिंकली. सध्याच्या सुरू असलेल्या मालिकेत गाले कसोटीच्या सुरुवातीचे तीन दिवस भारताने वर्चस्व राखल्यानंतर चौथ्या दिवशी गचाळ फलंदाजीने सामना गमावला. या धक्कादायक पराभवाने भारतीय खेळाडूही चकित झाले आहेत. आता दुसऱ्या कसोटीत कोहलीच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडू जुन्या चुका टाळून रणनीतीनुसार खेळतील, अशी आशा आहे.

भारताच्या अडचणी : या सामन्यात टीम इंडियासमोर आधीपेक्षा अधिक अडचणी आहेत. सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे मालिकेबाहेर झाला आहे. दुसरीकडे मुरली विजय अद्याप पूर्णपणे फीट झालेला नाही. युवा सलामीवीर लोकेश राहुल पहिल्या कसोटीत खेळला. मात्र, दोन्ही डावांत तो सपशेल अपयशी ठरला. भारताच्या तळाच्या फलंदाजांनीही दोन्ही डावांत निराशा केली होती. कोहली समोर सलामीच्या जोडीचा पेच कायम आहे. सलामीवीर मुरली विजय या सामन्यात खेळू शकतो.
२२ वर्षांपासून प्रतीक्षा
भारताला मागच्या २२ वर्षांपासून श्रीलंकेत मालिका विजय साजरा करता आलेला नाही. भारताने चुकून ही कसोटी गमावली तर मालिका विजयाचे स्वप्न पुन्हा लांबणीवर पडेल. यामुळे टीम इंडियासाठी ही कसोटी करा किंवा मरा अशीच असेल. भारताने हा सामना जिंकला तर मालिकेत १-१ ने बरोबरी होईल.

पुजारा सलामीला ? : या सामन्यात जखमी शिखर धवनच्या जागी चेतेश्वर पुजारा सलामीला खेळू शकतो. लोकेश राहुलच्या जागी त्याला अंितम अकरा संघात संधी मिळू शकते. पुजारा आणि मुरली विजय हे दोघे सलामीला असतील. तिसऱ्या क्रमांकावर रोहित, नंतर कोहली, रहाणे खेळतील. मागच्या सामन्यात अपयशी ठरलेल्या रोहित शर्मावर संघाचा विश्वास कायम आहे. तो पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे. रोहितने गाले कसोटीत ९ आणि ४ धावा काढल्या होत्या. तो फॉर्माशी संघर्ष करीत असला तरीही त्याला संघ व्यवस्थापनाचा पाठिंबा आहे. मागच्या सामन्यात सलामीवीर राहुलने १२ तर अजिंक्य रहाणेने ३६ धावा काढल्या होत्या. अशात टीम इंडियाचा फलंदाजी क्रम निश्चित करण्याची जबाबदारीही कोहलीवर असेल.

दोन्ही संघ असे
भारत > विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, के. एल. राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, आर. अश्विन, हरभजनसिंग, अमित मिश्रा, ईशांत शर्मा, भुवनेश्वरकुमार, उमेश यादव, वरुण अॅरोन, स्टुअर्ट बिन्नी.
श्रीलंका > अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), लाहिरी थिरिमाने, कुशल सिल्वा, करुणारत्ने, कुमार संगकारा, दिनेश चांदिमल, उपुल थरंगा, जेहान मुबारक, कुशल परेरा, रंगना हेराथ, डी. परेरा, थारिंडू कुशल, नुवान प्रदीप, धम्मिका प्रसाद, फर्नांडो, चामिरा.