आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या कसोटीदरम्यान दुखापत झाल्‍याने शिखर धवन कसोटी मालिकेतून "आऊट'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबो - भारताचा सलामीवीर शिखर धवन श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही. पहिल्या कसोटीदरम्यान त्याच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. त्याला पूर्ण तंदुरुस्त होण्यास एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी लागणार आहे. बीसीसीआयच्या मेडिकल टीमने ही माहिती दिली.

शिखर धवनने पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात १३४ तर दुसऱ्या डावात २८ धावा काढल्या होत्या. धवनने श्रीलंकेच्या दुसऱ्या डावाच्या वेळी बहुतेक वेळ क्षेत्ररक्षण केले नाही. १७६ धावांचा पाठलाग करताना त्याने २८ धावा काढल्या होत्या. धवन मालिकेबाहेर झाला हे दुर्दैव आहे, असे भारताचे टीम डायरेक्टर रवी शास्त्री यांनी म्हटले. दुखापत असताना तो खेळला आणि त्याने साहसी शतक ठोकले. पहिल्या कसोटीत पराभव झाल्यानंतर भारताला आता सलामीच्या जोडीवर पुन्हा एकदा नव्याने खलबते करावे लागतील. सध्या शानदार फॉर्मात असलेल्या रहाणेला सलामीला खेळवण्याचा विचार होऊ शकतो.
भज्जीसाठी धोक्याची घंटा
गाले कसोटीतील सुमार प्रदर्शन आणि भारताच्या पराभवानंतर अनुभवी ऑफस्पिनर हरभजनसिंग साठी धोक्याची घंटा वाजत आहे. पी.सारा ओव्हलवर २० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत त्याच्या समावेशाची शक्यता कमी आहे. पी.साराची खेळपट्टी श्रीलंकेत वेगवान गोलंदाजांसाठी अधिक लाभदायक मानली जाते. अशात कर्णधार विराट कोहली तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंसह खेळण्याचा निर्णय घेऊ शकतो. हरभजनने पहिल्या कसोटीत फक्त एक विकेट घेतली होती. मात्र, टीम इंडियाचा दुसरा ऑफस्पिनर आर. अश्विनने सामन्यात १० विकेट घेतल्या.
स्टुअर्ट बिन्नीचा टीम इंडियात समावेश
नवी दिल्ली - श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत सपाटून मार खाल्ल्यानंतर अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. बिन्नी श्रीलंकेत १६ वा सदस्य म्हणून संघात असेल. संघातील उर्वरित खेळाडू कायम राहतील. गाले कसोटीत ५ गोलंदाजांसह खेळल्याने भारताचे नुकसान झाले, असे म्हटल्या जाते. कोहलीचा हा निर्णय चुकला होता. अशा परिस्थितीत दुसऱ्या कसोटीत स्टुअर्ट बिन्नीचा समावेश होऊ शकतो.
ब्रॅडमन, सचिनसारखा संगकारा : शास्त्री
टीम इंडियाचे टीम डायरेक्टर रवी शास्त्री यांनीसुद्धा संगकाराची मुक्तकंठाने स्तुती केली. "मी पहिल्या सामन्यापासून संगकाराला खेळताना पाहिले आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत फॉर्ममध्ये सातत्य ठेवले. तो नेहमी अव्वल तीन खेळाडूंत सामील राहिला. सर डॉन ब्रॅडमन आणि सचिन तेंडुलकर अशा महान खेळाडूंच्या पंक्तीत संगकाराचे नाव घेतले जाऊ शकते,' असे त्यांनी यावेळी नमूद केले.