Home »Sports »From The Field» Kings Punjab Vs Indians At Indore News

IPL-10: नितीश, बटलरचा झंझावात; मुंबई इंडियन्‍सचा 8 गड्यांनी विजय

दिव्य मराठी न्यूज नेटवर्क | Apr 21, 2017, 06:53 AM IST

इंदूर - नितीश राणा (नाबाद ६२) अाणि सामनावीर जाेस बटलरच्या (७७) झंझावाती खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने गुरुवारी अायपीएलमध्ये शानदार विजय संपादन केला. मुंबईने अापल्या सहाव्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलच्या किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव केला. दाेन वेळच्या चॅम्पियन मुंबईने ८ गड्यांनी सामना जिंकला. मुंबईचा हा पाचवा विजय ठरला. तसेच पंजाबचा हा चाैथा पराभव ठरला.
प्रथम फलंदाजी करताना किंग्ज इलेव्हन पंजाबने ४ बाद १९८ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात मुंबईने १५.३ षटकांत २ गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबई इंडियन्सला पार्थिव पटेल अाणि जाेस बटलरने ८१ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. पार्थिव पटेलने १८ चेंडूंत ३७ धावा काढल्या. त्यानंतर बटलरने नितीश राणासाेबत दुसऱ्या गड्यासाठी ८५ धावांची भागीदारी केली. यामुळे मुंबईच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. जाेस बटलरने शानदार अर्धशतक ठाेकले. त्याने ३७ चेंडूंत ७ चाैकार अाणि ५ सणसणीत षटकारांच्या अाधारे ७७ धावा काढल्या.
नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पंजाबकडून हाशिम अामला (१०४) व मार्शने (२६) ४६ धावांची भागीदारी रचली. मॅक्लिनघनने मार्शला बाद केले.त्यानंतर साहाने ११, कर्णधार मॅक्सवेलने ४० धावांची खेळी केली. स्टाेईनिसला (१) समाधानकारक खेळी करता अाली नाही.

राणाचे तिसरे अर्धशतक
मुंबईचा युवा फलंदाज नितीश राणाने यंदा सत्रात तिसरे अर्धशतक झळकावले. त्याने पंजाबविरुद्ध नाबाद ६२ धावांची खेळी केली. त्याने ३४ चेंडूंत ७ षटकारांच्या अाधारे ही खेळी केली.

अामलाचे शतक व्यर्थ
पंजाबच्या हाशिम अामलाचे शतक व्यर्थ ठरले. त्याने ६० चेंडूंत ८ चाैकार व ६ षटकारांसह १०४ धावा काढल्या. त्याने मॅक्सवेलसाेबत तिसऱ्या गड्यासाठी ८३ धावांची भागीदारी रचली.

लसिथ मलिंगा, ईशांत महागडे
मुंबईकडून लसिथ मलिंगा व पंजाबचा ईशांत शर्मा सर्वात महागडे गाेलंदाज ठरले. या दाेघांनी ४ षटकांत प्रत्येकी ५८ धावा दिल्या. त्यांना विकेट काढता अाली नाही.

धावफलक
किग्ज इलेव्हन पंजाब धावा चेंडू ४ ६
हाशिम आमला नाबाद १०४ ६० ०८ ६
मार्श झे. पोलार्ड गो. मॅक्लिनघन २६ २१ ०५ ०
साहा त्रि.गो. कृणाल पंड्या ११ १५ ०० ०
मॅक्सवेल त्रि. गो. बुमराह ४० १८ ०४ ३
स्टोनिस झे. पोलार्ड गो. मॅक्लिनघन ०१ ०३ ०० ०
अक्षर पटेल नाबाद ०४ ०५ ०० ०
अवांतर : १२. एकूण : २० षटकांत ४ बाद १९८ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-४६, २-८०, ३-१६३, ४-१६६. गोलंदाजी : हार्दिक पांड्या २-०-१८-०, मॅक्लिनघन ४-०-४६-२, हरभजनसिंग २-०-१२-०, लसिथ मलिंगा ४-०-५८-०, कृणाल पंड्या ४-०-२९-१, जसप्रीत बुमराह ४-०-३०-१.

मुंबई इंडियन्स धावा चेंडू ४ ६
पार्थिव झे. मॅक्सवेल गो. स्टोनिस ३७ १८ ०४ २
बटलर झे. मॅक्सवेल गो. माेहित ७७ ३७ ०७ ५
नितीश राणा नाबाद ६२ ३४ ०० ७
हार्दिक पंड्या नाबाद १५ ०४ ०२ १
अवांतर : ८, एकूण : १५.३ षटकांत २ बाद १९९ धावा. गडी बाद क्रम : १-८१, २-१६६. गोलंदाजी : संदीप शर्मा ३-०-३९-०, ईशांत शर्मा ४-०-५८-०, मोहित शर्मा २.३-०-२९-१, स्टोईनिस २-०-२८-१, अक्षर पटेल २-०-२०-०, स्वप्निल सिंग २-०-२२-० .
सामनावीर : जाेस बटलर

Next Article

Recommended