आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंकेला विजयासाठी १५३ धावांचे लक्ष्य, दुसऱ्या डावात पाक सर्वबाद ३२९

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबो - अझहर अलीच्या शतकानंतरही पाहुण्या पाकिस्तान संघाला श्रीलंकेविरुद्ध दुस-या कसोटीच्या दुस-या डावात सर्वबाद ३२९ धावाच काढता अाल्या. पाकने पहिल्या डावात अवघ्या १३८ धावा जोडल्या होत्या. यानंतर लंकेने पहिल्या डावात ३१५ धावा काढून १७७ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. यामुळे श्रीलंकेसमोर आता ही कसोटी जिंकण्यासाठी अवघे १५३ धावांचे लक्ष्य आहे. सामन्याचा एक दिवस शिल्लक असून यजमान संघाच्या हाती सर्व १० विकेट शिल्लक आहेत.

चौथ्या दिवशी पाकने २ बाद १७१ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. कालचा नाबाद फलंदाज अझहर अलीने शानदार शतक ठोकले. त्याने ११७ धावा काढल्या. अझहर अलीने ३०८ चेंडूंचा सामना करताना ६ चौकार मारले. पाकचा अनुभवी फलंदाज युनूस खान ४० धावा काढून बाद झाला. अझहरला हेराथने, तर युनूसला मॅथ्यूजने बाद केले. कर्णधार मिसबाह मोठी खेळी करू शकला नाही. त्याने २२ धावा काढल्या. असद शफिकने २७, तर सरफराज अहमदने अवघ्या १६ धावांचे योगदान दिले. तळाचे फलंदाज यासिर शहा (०), झुल्फिकार बाबर (७), जुनेद खान (३), वहाब रियाज (६) यांनी फक्त हजेरी लावण्याचे काम केले. मधल्या फळीचे आणि तळाचे फलंदाज अपयशी ठरल्याने पाकला मोठी आघाडी घेता आली नाही. श्रीलंकेकडून धम्मिका प्रसादने ९२ धावांत ४ िवकेट, अँग्लो मॅथ्यूजने १५ धावांत २ विकेट, तर चामेराने ५३ धावांत ३ गडी बाद केले. रंगना हेराथने एकाला टिपले.

अझहर अलीची झुंज
तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या अझहर अलीने झुंज दिली. त्याने सुरुवातीला अहमद शहजादसोबत दुस-या विकेटसाठी शतकी १२० धावांची भागीदारी केली. याशिवाय त्याने गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. यानंतर त्याने तिसऱ्या विकेटसाठी युनूस खानसोबत ७३ धावा जोडल्या. मिसबाहसोबत ३२ धावांची तर असद शफिकसोबत ४० धावांची भागीदारी केली. पाककडून त्याच्याशिवाय इतर फलंदाजांनी नांग्या टाकल्या.

संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान पहिला डाव : १३८. श्रीलंका पहिला डाव ३१५. पाकिस्तान दुसरा डाव ३२९. (अहमद शहजाद ६९, अझहर अली ११७, युनूस खान ४०, ४/९२ प्रसाद).
बातम्या आणखी आहेत...