Home »Sports »From The Field» Team India Has The Number One Chance

टीम इंडियाला नंबर वनची संधी! ऑस्ट्रेलियादेखील आहे नंबर वनच्या शर्यतीत

वृत्तसंस्था | Sep 14, 2017, 03:00 AM IST

  • टीम इंडियाला नंबर वनची संधी! ऑस्ट्रेलियादेखील आहे नंबर वनच्या शर्यतीत
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेनंतर कसोटीसह वनडेतही नंबर होण्याची सुवर्ण संधी आली आहे. सध्या भारतीय संघ कसोटीत नंबर वन असून वनडेत तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे.
वनडे क्रमवारीत नंबर तीनवर आलेली टीम इंडिया नंबर दोनवर असलेल्या अॉस्ट्रेलियापेक्षा केवळ दशांश गुणांनी मागे राहिली. दाेन्ही संघांचे सध्या ११७ गुण आहेत. त्याचप्रमाणे भारतासह ऑस्ट्रेलियाचेदेखील या मालिकेतून नंबर वन बनण्याचे स्वप्न आहे. या दोन्ही देशांत १७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान पाच वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाईल. क्रमवारीत दक्षिण आफ्रिका सध्या ११९ गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान आहे. त्यामुळे भारत-ऑस्ट्रेलियाला नंबर वन होण्यासाठी केवळ २ गुणांची अावश्यकता आहे. या दोन्ही संघांपैकी जो संघ ४-१ ने मालिका आपल्या नावे करेल तो संघ वनडेत नंबरच्या स्थानावर विराजमान होईल. भारताने नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्यांना घरच्या मैदानावर ५-० ने हरवले. भारतीय खेळाडू जबरदस्त फॉर्मात आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने बांगलादेशविरुद्ध मोठ्या संघर्षानंतर कसोटी मालिका बरोबरीत ठेवण्यात यश मिळवले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला घरच्या वातावरणाचा निश्चित फायदा होईल. गत वर्षी कसोटी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला चार कसोटी सामन्याच्या मालिकेत २-१ ने मात दिली होती. सध्या भारतीय संघ कसोटीत मोठ्या अंतराने नंबर वनचा ताज मिळवला असल्याने त्यांच्यासाठी आता आगामी वनडे मालिका महत्त्वाची ठरणार आहे. आयसीसी विश्वकप उपांत्य फेरी आणि चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर आपला दबदबा कायम राखण्यासाठी वनडेत नंबर वन होणे आवश्यक आहे. त्यानंतर हा मुकुट कायम ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागेल.
मो. शमी करणार विश्वविक्रम
वेगवान गोलंदाज मोहंमद शमीचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत पहिल्या तीन सामन्यांसाठी भारताच्या १६ सदस्यीय संघात पुनरागमन झाले. या मालिकेत भारताचा हा वेगवान गोलंदाज एक विश्वविक्रम आपल्या नावे करू शकतो.त्याने पहिल्या दोन सामन्यांत एकूण ९ बळी घेतल्यास तो सर्वाधिक वेगाने १०० विकेट पूर्ण करणारा गोलंदाज ठरेल.
शमीने ४९ वनडेत आतापर्यंत ९१ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. सध्या सर्वात वेगवान १०० बळी घेण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कच्या नावे आहे. त्याने ५२ सामन्यांत ही कामगिरी केली. निवड समितीने कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघात वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरला संघाबाहेर करत एकमेव बदल केला.
ऑस्ट्रेलियाविरुूद्ध मालिका विजय मिळवणार : लक्ष्मण
ऑस्ट्रेलिया संघातील कमजोर गोलंदाजीमुळे विराट कोहलीच्या नेतृत्वातील टीम इंडिया ४-१ ने मालिका आपल्या नावे करणार असल्याची भविष्यवाणी भारताचा माजी फलंदाज व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने केली आहे.अनुभवी गोलंदाज नसल्याने युवा गोलंदाजांना स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी आहे. भारत-ऑस्ट्रेलिया हे प्रतिस्पर्धी राहिले असून रोमांचक क्रिकेट पहायला मिळेल. नाथन कोल्टर नाइल व फिरकीपटू अॅडम जंम्पावर मदार राहिल, असे ही तो म्हणाला.

Next Article

Recommended