आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND v SA: टीम इंडियाची घोषणा, गुरकिरतसिंग, श्रीनाथ नवे चेहरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आगामी टी-२० आणि वनडे मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडियात गुरकिरत सिंग आणि श्रीनाथ अरविंद या दोन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. लेगस्पिनर अमित मिश्राचे एका वर्षानंतर वनडे संघात पुनरागमन झाले आहे, तर सुमार कामगिरी करणारा अष्टपैलू रवींद्र जडेजाला दोन्ही संघांतून बाहेर करण्यात आले आहे.

बीसीसीआयने रविवारी टी-२० मालिकेशिवाय वनडे मालिकेतील पहिल्या तीन लढतींसाठी संघांची घोषणा केली. उर्वरित दोन वनडे आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड ऑक्टोबरमध्ये होईल. महेंद्रसिंग धोनीला वनडे आणि टी-२० च्या कर्णधारपदी कायम ठेवण्यात आले आहे. कसोटीतून निवृत्त झालेल्या धोनीला वनडेच्या कर्णधारपदावरून दूर केले जाऊ शकते, अशी चर्चा होती. मात्र, निवड समिती आणि बीसीसीआयने धोनीवर विश्वास कायम ठेवला आहे. निवड समितीचे प्रमुख संदीप पाटील म्हणाले, "आम्ही वनडेच्या कर्णधाराबाबत कोणतीच चर्चा केली नाही. धोनीच्या नेतृत्वामुळे आम्ही सर्व समाधानी आहोत. तोच संघाचे नेतृत्व करेल.' गुरकिरतच्या निवडीवर पाटील म्हणाले, "गुरकिरत अष्टपैलू आहे. तो अत्यंत प्रतिभावान आहे. त्याने गेल्या काही दिवसांत चांगली कामगिरी केली आहे. त्याला संधी मिळायला पाहिजे.'

दक्षिण आफ्रिकेचा ७२ दिवसांचा दौरा २९ सप्टेंबरपासून
दक्षिण आफ्रिकेची टीम ७२ दिवसांच्या दौऱ्यावर भारतात येत आहे. भारतात द. आफ्रिकेची टीम तीन टी-२०, पाच वनडे आणि चार कसोटी सामन्यांत खेळेल. मालिकेतील पहिला सामना २९ सप्टेंबरपासून आहे. पहिला टी-२० सामना धर्मशाला येथे २ ऑक्टोबर रोजी होईल. टी-२० नंतर वनडे मालिका होईल.

गुरकिरतसिंग मान
पंजाबचा २५ वर्षीय ऑफस्पिनर आहे. ३९ लिस्ट अ सामने खेळताना एका शतकासह १३७९ धावा काढल्या. १० विकेटसुद्धा त्याच्या नावे आहेत. नुकत्याच बांगलादेश अ संघाविरुद्ध एका सामन्यात त्याने ६५ धावा काढताना ५ गडी बाद केले होते.
श्रीनाथ अरविंद
कर्नाटकचा डावखुरा मध्यमगती गोलंदाज आहे. २४ लिस्ट अ सामने खेळताना ४० विकेट घेतल्या आहेत. बांगलादेश अ संघाविरुद्ध तीन वनडेत ५ गडी बाद केले. टी-२० च्या ४५ सामन्यांत ५५ विकेट घेतल्या आहेत. अरविंद आयपीएलमध्ये बंगळुरूकडून खेळतो.
भारताचा टी-२० संघ
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, स्टुअर्ट बिन्नी, आर. अश्विन, अक्षर पटेल, हरभजनसिंग, भुवनेश्वरकुमार, मोहित शर्मा, अमित मिश्रा, श्रीनाथ अरविंद.
वनडे टीम (३ सामन्यांसाठी)
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, स्टुअर्ट बिन्नी, आर. अश्विन, अक्षर पटेल, गुरकिरतसिंग मान, अमित मिश्रा, भुवनेश्वरकुमार, मोहित शर्मा, उमेश यादव.