आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NZ विरुद्धच्या तीन ODI साठी टीम इंडियाची घोषणा, रैनाचे पुनरागमन; जयंत, धवलला संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताच्या नव्या निवड समितीने न्यूझीलंडविरुद्ध आगामी पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन लढतीसाठी भारतीय संघाची घोषणा केली. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यीय टीम इंडिया १६ ते २९ ऑक्टोबरदरम्यान न्यूझीलंडसोबत पाच वनडे सामने खेळेल. या मालिकेसाठी भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन, अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा, वेगवान गोलंदाज मोहंमद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे. जयंत यादव, धवल कुलकर्णी, मनदीप सिंग तर हार्दिक पंड्याचा प्रथमच वनडे संघात समावेश करण्यात आला.

के. एल. राहुल, शिखर धवन आणि भुवनेश्वरकुमार जखमी असल्यामुळे त्यांचा संघात समावेश झालेला नाही. युवराजसिंगचेसुद्धा वनडेत पुनरागमन होऊ शकले नाही. मात्र, सुरेश रैनाने एकदिवसीय संघात पुनरागमन केले आहे. अश्विन, जडेजा संघाबाहेर असल्याने फिरकीची जबाबदारी अमित मिश्रा, अक्षर पटेल यांच्यावर असेल. वेगवान गोलंदाजीची मदार जसप्रीत बुमराह, उमेश यादव, धवल कुलकर्णी यांच्यावर असेल. हार्दिक पंड्या अष्टपैलूची भूमिका पार पाडेल.

वर्षभराने रैनाचे पुनरागमन
सुरेश रैनाने ऑक्टोबर २०१५ मध्ये अखेरचा वनडे सामना खेळला होता. यानंतर डिसेंबर-जानेवारीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आणि नंतर जूनमध्ये झिम्बाब्वे दौऱ्यात वनडे संघात त्याची निवड झाली नव्हती. वेस्ट इंडीजविरुद्ध आॅगस्टमध्ये झालेल्या दोन टी-२० सामन्यांसाठीही त्याला संधी मिळाली नव्हती. आता जवळपास एक वर्षाने त्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.

कोण आहे जयंत यादव ?
ऑफस्पिनर जयंत यादवने २०११ पासून हरियाणा संघाकडून रणजी करिअरला सुरुवात केली. मागच्या सत्रात त्याने दमदार प्रदर्शन केले. २०१४-१५ सत्रात त्याने ३२.२च्या स्ट्राइक रेटने ३३ विकेट घेऊन निवड समितीचे लक्ष वेधले हाेते. या प्रदर्शनामुळे लिस्ट-ए सामन्यांसाठी भारत अ संघात त्याला संधी मिळाली. जयंतने मागच्या रणजी सत्रात २१ बळी घेतले. इतकेच नव्हे तर त्याने कर्नाटकविरुद्ध सेहवागसोबत खेळताना शतक ठोकले होते.

सलामीला कोण खेळणार?
के.एल.राहुल, धवनच्या अनुपस्थितीत वनडेत रोहित शर्मासोबत सलामीला कोण खेळणार ? हा प्रश्न कायम आहे.मनदीपसिंग किंवा अजिंक्य रहाणेपैकी एक सलामीला खेळू शकतो.

भारतीय संघ असा
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, मनीष पांडे, सुरेश रैना, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जयंत यादव, अमित मिश्रा, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, उमेश यादव, मनदीप सिंग, केदार जाधव.
वनडे मालिकेचा शेड्यूल
पहिला सामना : 16 ऑक्टोबर , धर्मशाळा
दुसरा सामना : 20 ऑक्टोबर , दिल्ली
तिसरा सामना : 23 ऑक्टोबर , चंदीगड
चौथा सामना : 26 ऑक्टोबर , रांची
पाचवा सामना : 29 ऑक्टोबर , विशाखापट्टनम
बातम्या आणखी आहेत...