आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचा बांगलादेश दौरा : कोहली ब्रिगेडची "कसोटी'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फातुल्ला - भारत आणि बांगलादेश यांच्यादरम्यान मालिकेतील एकमेव कसोटी सामन्याला बुधवारपासून सुरुवात होत आहे. ही कसोटी टीम इंडिया विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळेल. फातुल्ला मैदानावर ९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी सामना होत आहे. भारताने बांगलादेशविरुद्ध आतापर्यंत ७ कसोटी सामने खेळले असून यातील सहामध्ये विजय मिळवला आहे. टीम इंडिया तब्बल पाच वर्षांनंतर बांगलादेशात कसोटी खेळण्यास पोहोचली आहे.
भारताच्या सर्वाधिक यशस्वी कर्णधारांपैकी एक सौरव गांगुलीने १५ वर्षांपूर्वी बांगलादेशविरुद्ध एका कसोटीद्वारेच पूर्णकालीन कर्णधार म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली होती. आता कोहली पूर्णकालीन कर्णधार म्हणून सुरुवात करत आहे.
भारताची बाजू उजवी : भारताने बांगलादेशविरुद्ध ७ कसोटी खेळताना ६ मध्ये विजय मिळवला, तर चितगाव येथे २००७ मध्ये एक कसोटी सामना पावसामुळे ड्रॉ झाला. भारताची बाजू या सामन्यात भक्कम मानली जात आहे. शिखर धवन, मुरली िवजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि विराट कोहली धावांचा डोंगर उभा करण्यास सक्षम आहेत. मात्र, रुबेल हुसैनच्या नेतृत्वाखाली बांगलादेशच्या आक्रमणाचा सामना करणे भारतासाठी सोपे ठरणार नाही.
भज्जीवर सर्वांच्या नजरा : गोलंदाजीत सर्वांच्या नजरा हरभजनसिंगवर असतील. भज्जी दोन वर्षांनी संघात परतला आहे. आर. अश्विनसोबत तो फिरकीची जबाबदारी पार पाडू शकतो. वेगवान गोलंदाजीची मदार ईशांत शर्मा सांभाळेल. त्याच्यासोबत भुवनेश्वर, उमेश यादव आणि अॅरोन असतील.
बांगलादेशचे कोच, कर्णधार खेळपट्टी बघून चकित
फातुल्ला स्टेडियमची खेळपट्टी बघून बांगलादेश क्रिकेट संघाचे प्रशिक्षक चंडिका हथरुसिंघे आणि कर्णधार मुशाफिकूर रहीम चकित झाले. या खेळपट्टीवर खूप गवत आहे. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळवण्याची शक्यता कमी आहे, असे हथरुसिंघे यांनी म्हटले.
मॅनेजरचा ड्रामा
कसोटी सामन्याच्या एक दिवस आधी बांगलादेश क्रिकेट संघात ड्रामा सुरू झाला. टीम मॅनेजर खालिद महमूद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने एकच गोंधळ उडाला. टीम मॅनेजरने राजीनामा दिल्याने बांगलादेश क्रिकेट संघाला जबर धक्का बसला. मात्र, थोड्या वेळाने पुन्हा कामावर परतून खालिद यांनी सर्वांना चकित केले. खालिद यांचा राजीनामा फक्त एक नाटक ठरले.
दोन्ही संघांची निवड यातून होईल
भारत : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, वृद्धिमान साहा, हरभजनसिंग, आर. अश्विन, वरुण अॅरोन, उमेश यादव, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार.
बांगलादेश : मुशाफिकूर रहिम (कर्णधार), तमीम इक्बाल, अबुल हसन, इमरुल कायेस, जुबेर हुसेन, लिट्टन दास, मोहंमद शहीद, मोमिनुल, नासेर हुसेन, रुबेल, सकिब-अल-हसन, साैम्य सरकार, तैजूल इस्लाम.
मोमिनुलवर नजरा : बांगलादेशच्या मोमिनुलने कसोटीत सलग ११ अर्धशतके ठोकली आहेत. या सामन्यातही त्याने अर्धशतक ठोकले तर तो डिव्हिलर्सच्या सलग १२ कसोटी अर्धशतके ठोकण्याच्या विक्रमाची बरोबरी करेल.
फातुल्लावर टीम इंडियाचा सराव नाही
भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकमेव कसोटी सामना फातुल्ला स्टेडियमवर होणार आहे. ८ जून रोजी ढाका येथे पोहोचल्यानंतर टीम इंडियाला फातुल्ला स्टेडियमवर सराव करायचा होता. मात्र, बांगलादेश क्रिकेट मंडळाने परवानगी नाकारली. स्टेडियम रिकामे नाही. बांगलादेशचे खेळाडू तेथे सराव करीत आहेत, असे मंडळाने सांगितले.
तमीम, रहीम, सकिबवर मदार
रुबेल हुसेनचे पुनरागमन ही बांगलादेशसाठी चांगली बातमी आहे. मात्र, शहादत हुसेन गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्याने खेळू शकणार नाही. यजमान संघाकडून धावा काढण्याची जबाबदारी तमीम इक्बाल, रहिम आणि सकिब यांच्यावर असेल.
बातम्या आणखी आहेत...