आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फलंदाजीच्या नंदनवनात गोलंदाजीला महत्‍त्‍व, टीम इंडियाचा कसून सराव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - जामठा येथील विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानावर भारत व दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघात २५ नोव्हेंबरपासून तिसरी कसोटी रंगणार आहे. तत्पूर्वी सामन्याची रणनीती ठरवण्याच्या दृष्टीने उभय संघांनी दोन दिवस आधी सोमवारी मैदानावर कसून सराव केला. विशेषत: दोन्ही संघांनी त्यांच्या महत्त्वाच्या खेळाडूंच्या सरावावर भर दिला.
दुपारी २ वाजता मैदानावर आल्यानंतर भारतीय संघाची जमेची बाजू फिरकी असल्यामुळे सरावादरम्यान फिरकीपटूंनी जास्तीत जास्त वेळ नेट्सवर घालवला. याशिवाय महत्त्वाच्या फलंदाजांनीही फटकेबाजीचा कसून सराव करीत जामठा येथील फलंदाजांसाठी लाभदायक खेळपट्टीबाबत मंथन केले. कदाचित ही खेळपट्टीही फिरकीपटूंना सहकार्य करेल, असे प्रथमदर्शनी तिच्याकडे बघून वाटत आहे.

क्युरेटरने मात्र अद्याप खेळपट्टीच्या स्वरूपाबाबत कोणतेही संकेत दिले नाहीत. तरीही भारतीय संघासाठी ही खेळपट्टी अनुकूल असेल, असा अंदाज स्टेडियमवरील तज्ज्ञांनी वर्तवला आहे. तशीही जामठा येथील खेळपट्टी दुसऱ्या दिवशी दुपारपासून फिरकीपटूंना सहकार्य करते असा अंदाज आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरू शकतो. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ते बघता कोहली अँड कंपनीने वेगवान गोलंदाजीचा जास्तीत जास्त सराव करण्यास वेळ दिला.

विशेष बाब अशी की, मालिकेतील बंगळुरू येथील सामना पावसाने धुऊन काढल्याने चार सामन्यांच्या या मालिकेतील उर्वरित तिन्ही सामन्यांमध्ये खेळाडू तंदुरुस्त राहावेत या उद्देशाने फिटनेसवरही भर देण्यात आला. तिकडे दक्षिण आफ्रिका संघातील मुख्य फलंदाजांनी फिरकीपटूंचा सामना कसा परिणामकारकपणे करता येईल यावर विचार करून संघातील फिरकीपटूंसोबतच स्थानिक खेळाडूंकडून फिरकीवर फलंदाजीचा सराव करून घेतला. त्यामुळे भारताची फिरकी आणि जर डेल, फिलँडर यांचा आफ्रिकन अंतिम एकादशमध्ये समावेश झाला तर पाहुण्यांचा भन्नाट मारा अशी झुंज रोचक ठरणार आहे. फिरकीला अनुकूल खेळपट्टीमुळै भारताकडून अमित मिश्राला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते.
स्टेनच्या तंदुरुस्तीकडे दोन्ही संघांचे लक्ष
स्टेनगन नावाने प्रसिद्ध अन् कोणत्याही क्षणी धारदार माऱ्याच्या जोरावर सामन्याचे पारडे फिरवण्यात तरबेज असलेला द.आफ्रिकेचा द्रुतगती गोलंदाज डेल स्टेनचा दोन्ही बाजूने भन्नाट वेगाने चेंडू स्विंग करण्यात हातखंडा असल्यामुळे त्याच्या तंदुरुस्तीकडेच अाफ्रिकन संघ व्यवस्थापनाचे पूर्ण लक्ष होते. त्याने नेट्सवर हलका सरावही केला. त्याची गोलंदाजी बघून संघ व्यवस्थापनाच्या चेहऱ्यावर समाधान दिसल्याचे जाणवले. अन्य एक महत्त्वाचा जलद गोलंदाज फिलँडरही आता दुखापतीतून सावरत असल्यामुळे द.आफ्रिकन्स भारताला नागपुरात जोरदार लढत देण्याचे मनसुबे आखत आहेत.
स्टेनबाबत ‘वेट अँड वाॅच’ : मोर्केल
डेल स्टेनने सोमवारी सकाळच्या सत्रात नेट्सवर गोलंदाजीचा सराव केला. त्यामुळे त्याचा भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत अंतिम एकादशमध्ये समावेश होण्याची आशा बळावली आहे. मात्र, संघ व्यवस्थापनाची अजूनही स्टेनबाबत ‘वेट अँड वाॅच’ अशी भूमिका असल्याची माहिती पत्रपरिषदेत अन्य एक आफ्रिकेचा द्रुतगती गोलंदाज मोर्ने मोर्केलने दिली. नेट्समध्ये डेलला गोलंदाजी करताना बघणे हा सुखद अनुभव होता. त्याच्या तंदुरुस्तीत होणाऱ्या सुधारणेकडे संघ व्यवस्थापन बारकाईने लक्ष देत असल्याचे मोर्केल म्हणाला.